सहकारमहर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय स्पर्धा यशस्वीरीत्या संपन्न

संगमनेर / लोकवेध live न्यूज 
सहकारमहर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयामध्ये मराठी राजभाषा गौरव दिनाचे औचित्य साधून सहकारमहर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात स्मृती करंडक आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात व यशस्वीरीत्या संपन्न झाली.
या स्पर्धेचे उद्घाटन मा.डॉ.आ.सुधीरजी तांबे साहेब यांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी बोलताना त्यांनी वि.वा.शिरवाडकर यांच्या कुसुमाग्रज या नावाचे रहस्य सांगून, ‘आम्हां घरी धन शब्दांचीच रत्ने | शब्दाची शस्त्रे यत्न करूं ||’ या तुकाराम महाराजांच्या अभंगातून मराठी भाषेचे महत्त्व विशद केले. आदरणीय दादांच्या समाजकार्याचा वसा आणि वारसा महाविद्यालयीन युवक युवतींना प्रेरणादायी असून विद्यार्थ्यांनी त्यांच्या विचारांचे अनुकरण केले पाहिजे असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे सहसेक्रेटरी मा.श्री.दत्तात्रय चासकर यांनी स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.दिनानाथ पाटील, उपप्राचार्य डॉ.बाळासाहेब वाघ, उपप्राचार्य डॉ.विलास कोल्हे, कार्यालयीन अधीक्षक श्री.गोरक्षनाथ पानसरे आदी उपस्थित होते.
या राज्यस्तरीय वकृत्व स्पर्धेत अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेज  संगमनेर चा संघ या करंडकाचा मानकरी ठरला. या स्पर्धेत बेलापूर महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु.प्रणाली पाटील प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली, अजय सकटे, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांक उशीर महेश, न्यू आर्ट्स कॉलेज अहमदनगर याने मिळविला, उत्तेजनार्थ क्रमांक कु.नम्रता मोरे, सिंहगड अॅकडमी कॉलेज इंजिनिअरिंग पुणे हिने तर विशेष उत्तेजनार्थ पुरस्काराचा मानकरी सहकारमहर्षी भाऊसाहेब संतूजी थोरात महाविद्यालयाचा विद्यार्थी अभिषेक वाघ ठरला.
या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील विविध २९ महाविद्यालयांनी सहभाग नोंदविला. या स्पर्धेचे परीक्षण मा.श्री.संदीप वाकचौरे व मा.श्री.शिवराज आनंदकर यांनी केले. या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.दिनानाथ पाटील यांनी केले. नॅक समन्वयक डॉ.लक्ष्मण घायवट यांनी परीक्षकांची ओळख करून दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.स्नेहल थिटमे व प्रा.वैशाली शिंदे यांनी केले. तर मराठी विभाग प्रमुख डॉ.राजेंद्र जोरवर यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी वकृत्व मंडळाच्या समन्वयक डॉ.संगीता वडितके, समिती सदस्य प्रा.निलोफर तांबोळी, प्रा.पल्लवी गडाख, प्रा.नवनाथ नागरे, प्रा.मोहिनी काशीद, डॉ.दिपाश्री गडाख,प्रा.श्रीकांत ढापसे, प्रा.मंगेश जोर्वेकर, डॉ.स्वाती ठुबे, डॉ.गणेश वाळुंज, प्रा.सीमा मोरे, प्रा.नानासाहेब दिघे, डॉ.अनुपमा कांदळकर, श्री.अमोल टपले, श्री.प्रवीण फटांगरे आदींनी परिश्रम घेतले. यावेळी महाविद्यालयीन सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर सेवकवृंद, स्पर्धक, विद्यार्थी आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!