डाएट संगमनेर कडून टाकळी केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेस भेट व मार्गदर्शन
अकोले / लोकवेध live न्यूज
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डाएट) संगमनेर व पंचायत समिती शिक्षण विभाग अकोले यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षकांच्या शैक्षणिक सबलीकरणासाठी व विद्यार्थी गुणवत्ता वृध्दी करीता दरमहा शिक्षण परिषदांचे आयोजन केले जाते. त्यानुसार नुकतीच जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा टाकळी, बीट देवठाण, ता. अकोले येथे माहे जुलै महिन्याची प्रथम शिक्षण परिषद अत्यंत उत्साहवर्धक व आनंददायी वातावरणात संपन्न झाली. परिषदेच्या अध्यक्षस्थानी गर्दणी शाळेचे मुख्याध्यापक श्री.सोमनाथ घोरपडे होते. या परिषदेस डाएट संगमनेरचे ज्येष्ठ अधिव्याख्याता श्री.अरूण भांगरे व श्री. कैलास सदगीर यांनी भेट देवून उपस्थित शिक्षकांना अध्ययन समृद्धी कृती कार्यक्रम, पायाभूत संख्याज्ञान व भाषिक साक्षरता तसेच नवीन शैक्षणिक धोरणांतील बदल या विषयांवर मौलिक मार्गदर्शन केले. तज्ञ सुलभक श्री तुकाराम आवारी यांनी अहमदनगर जिल्ह्यातील अध्ययन समृद्धी कार्यक्रम व FLN बाबत मार्गदर्शन केले. तसेच श्रीमती सुनिता वल्टे यांनी कृती कार्यक्रम निर्मिती व सादरीकरण, आनंददायी शनिवार या विषयांवर उपस्थितांचे उद्बोधन केले. परिषदेचे समन्वयक व टाकळी केंद्रशाळेचे मुख्याध्यापक श्रीनिवास पोतदार यांनी शिक्षण परिषदांचे शैक्षणिक महत्त्व व टाकळी केंद्रातील शाळांची गुणवत्ता प्रतवारी यांबाबत सादरीकरण केले. याशिवाय परिषदेस उपस्थित देवठाण बीटाचे शिक्षण विस्तार अधिकारी श्री.अनिल गायकवाड व टाकळी केंद्राच्या केंद्रप्रमुख श्रीमती रोहिणी खतोडे यांनी भविष्यवेधी शिक्षण तसेच मिशन आरंभ शिष्यवृत्ती अभियान या संदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले. टाकळी शाळेतर्फे उपस्थित मान्यवरांचे गुलमोहर व चिंचेच्या झाडांची रोपे भेट देवून स्वागत करण्यात आले. शिक्षण परिषदेच्या यशस्वीतेसाठी टाकळी शाळेचे शिक्षक श्रीनिवास पोतदार, संजय देशमुख, दत्तात्रय देवगिरे व संजय शिंदे यांनी विशेष परिश्रम घेतले.