पिंपरणे ग्रामपंचायत उपसरपंचपदी बाळासाहेब निकम यांची बिनविरोध निवड

संगमनेर :

संगमनेर तालुक्यातील राजकीय दृष्ट्या अतिशय प्रतिष्ठेची समजली जाणारी पिंपरणे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदाची निवडणूक सोमवार, दि. 13 एप्रिल रोजी उत्सुकतेच्या वातावरणात बिनविरोध पार पडली. उपसरपंचपदासाठी बाळासाहेब गंगाधर निकम यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली.

पिंपरणे ग्रामपंचायत ही तालुक्यातील राजकीय घडामोडींमध्ये नेहमीच चर्चेत राहणारी ग्रामपंचायत मानली जाते. त्यामुळे उपसरपंचपदाच्या निवडीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले होते. या पदासाठी अनेक नाट्यमय राजकीय घडामोडी घडल्या, विविध स्तरावर चर्चा, बैठका आणि समीकरणे रंगली. मात्र अखेर सर्व घडामोडींना पूर्णविराम देत बाळासाहेब निकम यांनी उपसरपंचपद मिळवण्यात यश संपादन केले.

निवडणूक प्रक्रियेनुसार सकाळी 10 ते 12 या वेळेत नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यात आले. दुपारी 12 ते 1 या वेळेत नामनिर्देशन पत्रांची छाननी करण्यात आली. तसेच दुपारी 1 ते 2 या वेळेत अर्ज माघारी घेण्याची मुदत देण्यात आली होती. या संपूर्ण प्रक्रियेत बाळासाहेब निकम यांचाच एकमेव अर्ज वैध ठरल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली

ही निवडणूक सरपंच नारायण मरभळ व ग्रामसेविका जयश्री काशीद यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. निवडणूक प्रक्रियेदरम्यान ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी वर्ग, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बाळासाहेब निकम यांच्या निवडीबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला. आता त्यांच्या निवडीमुळे ग्रामविकासाच्या कामांना अधिक गती मिळेल, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात येत आहे. पिंपरणे गावाच्या सर्वांगीण विकासासाठी नव्या उपसरपंचांकडून सकारात्मक कार्य होईल, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!