पोतदार परिवाराकडून वडिलांचा ७५ व्या वाढदिवसाचा अमृत महोत्सवी सोहळा जल्लोषात साजरा
हरसूल – घोटी ( नाशिक ) लोकवेध live न्यूज
येथे स्थायिक झालेले श्री. श्रीनिवास पोतदार ( प्राथमिक शिक्षक, अकोले, जिल्हा अहमदनगर ) व श्री. श्रीकांत पोतदार ( सिनियर मॅनेजर, इन्फोसिस, पुणे ) तसेच सौ. अस्मिता बागुल – पोतदार ( कमर्शियल ब्युटी आर्टिस्ट, फिल्मसिटी, मुंबई ) यांनी आपले वडिल श्री. विजयशेठ सुपडूशेठ पोतदार यांचा ७५ व्या वाढदिवसाचा अमृत महोत्सवी सोहळा घोटी येथे नुकताच जल्लोषात साजरा केला. या संस्मरणीय कार्यक्रमासाठी शैक्षणिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील तसेच आप्तेष्ट मित्रपरिवारातील बहुसंख्य स्नेहीजण आवर्जून उपस्थित होते. या निमित्ताने उपस्थित मान्यवरांनी सत्कारमूर्ती श्री. विजयशेठ पोतदार यांना वाढदिवसाच्या अंतःकरणपूर्वक शुभेच्छा दिल्या. तसेच शुभेच्छा संदेशात व मनोगतात मित्र मंडळी, आप्तेष्ट व कुटुंबियांनी सत्कारमूर्ती श्री. पोतदार यांचा संघर्षमय जीवन प्रवास उलगडून दाखविला. आमच्या वडिलांनी नशिबावर विश्वास न ठेवता स्वतः कष्ट करायला शिकवले, “थेंबे थेंबे तळे साचे” हा बचतीचा महान मूलमंत्र देऊन हरसूल पंचक्रोशीत अखंड आदर्श “बचत सेवाकार्य” केले व आजसुद्धा ते करीत आहेत. वडिल कुणासाठी “गुंतवणूक गुरु” तर कुणासाठी “देवमाणूस” असल्याची भावना मुलांनी व नातवंडांनी व्यक्त केली. महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण योजनेंतर्गत श्री. विजय पोतदार यांनी “आदर्श सेवक” म्हणून भंडारा, सालेकसा, मोखाडा, हरसूल, नाशिक व नांदेड येथे प्रामाणिकपणे शासकीय नोकरी केली. मात्र त्याकाळी तुटपुंज्या पगारात कुटुंब चालविणे कठीण काम होते. या परिस्थितीत वडिलांनी सन १९८४ मध्ये सौ. आईच्या नावावर पोष्टाची आर. डी. व अल्पबचत एजन्सी घेतली. या एजन्सी अंतर्गत सन १९९६ मध्ये हरसूल विभागातील सर्वोत्कृष्ट पारदर्शक “विश्वासपात्र सेवा” कार्यासाठी वडिल व आई सौ. रत्नमाला यांना “आदर्श अभिकर्ता” पुरस्काराने श्री. सानप साहेब, कलेक्टर नाशिक यांनी सन्मानित केले. त्याकाळी वडिलांनी हरसूल भागातील अनेक खेड्यापाड्यांना पायी तसेच सायकलीने प्रवास करून घरोघरी बचतीचा संदेश पोहोचविला. त्यामुळे अनेक कुटुंब भविष्यात आत्मनिर्भर होऊ शकली. आजसुद्धा पोतदार परिवाराने वडिलांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून बचतकार्यास वाहून घेतले आहे. आमच्या वडिलांनी हरसूल येथे आदिवासीबहुल अतिदुर्गम भागात अनेक वर्षे “स्टॅम्प वेंडर” म्हणूनही सेवा दिली आहे. तसेच इन्फोटेक फिचर्स, मुंबई मार्फत मिळालेली पत्रकारीता सनद हरसूल, पेठ व त्र्यंबक तालुक्यातील जनतेच्या विधायक कामांसाठीच उपयोगात आणली. याबाबत अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त करताना श्रीमान विजय पोतदार यांनी शून्यातून विश्व कसे उभे केले ? व त्यांच्या खडतर जीवन प्रवासातील क्षणांना उजाळा दिला. सत्कारमूर्ती श्री. पोतदार हे हरसूलकरांचे “साहेब” नातेवाईकांचे राजूकाका तसेच राजाभाऊ असून दृढ इच्छाशक्ती व दुर्दम्य महत्त्वाकांक्षेचे प्रतीक आहेत. त्यांचा जीवनपट सकल समाजासाठी प्रेरणादायी असल्याची भावना अनेकांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केली. या निमित्ताने पोतदार परिवाराकडून आगामी शैक्षणिक सत्रात अकोले, इगतपुरी व त्र्यंबक पेसा क्षेत्रातील जिल्हा परिषद शाळांना ५००० पूरक वाचन पुस्तके भेट देण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते व बचत गुरुवर्य श्री. विजयशेठ पोतदार यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या दिमाखदार सोहळ्यासाठी हरसूल व्यापारी असोसिएशनचे श्री. रमेश अण्णा देवरगावकर, शांताराम आप्पा देवरगावकर, मोहन बागडे, कैलासशेठ देवरगावकर, रामेश्वर देवरगावकर, समदभाई शेख, योगेश गवळी, मुकेश निकम उपस्थित होते. तसेच घोटी सुवर्णकार समाजामार्फत कार्याध्यक्ष श्री. बाळासाहेब माळवे, अध्यक्ष संदिप भाऊ शहाणे, नंदकुमार फाकटकर सर, दिलीप कुलथे, सुनिल टाकळकर, सुरेश उदावंत, विलास बाणाईत, सतीश नागरे, दिपक काजळे, महेश शहाणे उपस्थित होते. वाढदिवस अभिष्टचिंतन कार्यक्रमाच्या सोनेरी दिवसाची सांगता रामरक्षा स्तोत्र व पसायदानाने झाली. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हरि पार्क सोसायटी घोटी येथील रहिवाशांनी उत्तम सहकार्य केल्याबद्दल सोसायटी समन्वयक श्री. श्रीनिवास पोतदार सर यांनी सर्वांचे आभार मानले.
