“सारे भेद सोडूया, माणूस माणूस जोडूया”चा संदेश देत रत्नाकर शेजवळ यांनी सर केला हम्पता पास
नाशिक | प्रतिनिधी
नाशिक जिल्ह्यातील रेल्वे डाक सेवेचे कर्मचारी तथा आंतरराष्ट्रीय सायकलपटू रत्नाकर शेजवळ यांनी हिमाचल प्रदेशातील पीर पंजाल पर्वतरांगेतील प्रसिद्ध हम्पता पास ट्रेक यशस्वीरित्या पूर्ण करत “सारे भेद सोडूया, माणूस माणूस जोडूया” हा सामाजिक ऐक्याचा प्रेरणादायी संदेश दिला आहे.
युथ हॉस्टेल असोसिएशन ऑफ इंडिया (YHAI) आयोजित या साहसी मोहिमेत देशभरातील ३८ गिर्यारोहक सहभागी झाले होते. महाराष्ट्रातून नाशिकचे रत्नाकर शेजवळ यांच्यासह नागपूरचे प्रणय वाळुंद्रे आणि धर्मेंद्र कुमार यांनी या मोहिमेत सहभाग नोंदविला.
मनालीजवळील जॉब्रा येथून सुरू झालेला हा ट्रेक चिका, बालू का घेरा, हम्पता पास, शेआ गोसू आणि छत्रू या मार्गाने पूर्ण करण्यात आला. सुमारे २७ किलोमीटरचा आणि समुद्रसपाटीपासून १४,०६५ फूट उंचीवरील हा ट्रेक गिर्यारोहकांनी अवघ्या पाच दिवसांत यशस्वीरित्या पूर्ण केला. या मोहिमेदरम्यान थंडी, मुसळधार पाऊस, वेगवान वारे तसेच कठीण पर्वतीय चढ-उतारांचा सामना करत सर्वांनी धैर्य आणि चिकाटीचे दर्शन घडविले.
हिमाचल प्रदेशातील सर्वाधिक निसर्गरम्य ट्रेकपैकी हम्पता पास हा एक मानला जातो. हिरव्यागार कुल्लू खोऱ्याला लाहौल-स्पीतीच्या खडकाळ प्रदेशाशी जोडणाऱ्या या मार्गावर हिरवीगार कुरणे, धबधबे, रंगीबेरंगी फुलांची दरी, बर्फाच्छादित पर्वत आणि नयनरम्य चंद्रताल सरोवर पर्यटकांना आकर्षित करतात. जून ते सप्टेंबर हा या ट्रेकसाठी सर्वोत्तम कालावधी मानला जातो.
यापूर्वीही रत्नाकर शेजवळ यांनी महाराष्ट्रातील ३६ पैकी ३६ जिल्ह्यांचा प्रवास पूर्ण केला असून त्यापैकी २४ जिल्ह्यांचा सायकलद्वारे प्रवास करत शांतता, सद्भावना आणि सामाजिक ऐक्याचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविला आहे. हम्पता पास यशस्वीरित्या सर करून त्यांनी साहस, जिद्द आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश पुन्हा एकदा देशभर पोहोचवत नाशिक जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
