*पिंपरणेच्या विकासाला नवी झेप; आंबेडकर नगरातील अभ्यासिकेसाठी तब्बल २० लाखांचा निधी मंजूर*
जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व आमदार अमोल खताळ यांच्या विशेष प्रयत्नांना यश; ग्रामस्थांकडून आभार
*पिंपरणे | प्रतिनिधी*
पिंपरणे गावाच्या विकासात आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला गेला असून, राज्य शासनाच्या ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजने’ अंतर्गत आंबेडकर नगर येथे अत्याधुनिक अभ्यासिका उभारण्यासाठी २० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीमुळे परिसरातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक सुविधा उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात मंजूर झालेला हा निधी राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांच्या विशेष प्रयत्नातून प्राप्त झाला आहे. या कामासाठी भाजप अश्वी मंडल प्रमुख गोकुळ दिघे तसेच पिंपरणे येथील शिवसेना नेते काकासाहेब गायकवाड यांनी सातत्याने पाठपुरावा करून महत्त्वाची भूमिका बजावली.
शासनाच्या निर्णयानुसार या योजनेतील विकासकामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून, संबंधित शासकीय विभागांच्या माध्यमातून नियमानुसार कामे पूर्ण करण्यात येणार आहेत. या योजनेअंतर्गत रस्ते, गटारे, पिण्याच्या पाण्याच्या सुविधा, समाजमंदिर, वाचनालय, अभ्यासिका, व्यायामशाळा, प्रशिक्षण केंद्र तसेच विविध सामाजिक व सांस्कृतिक विकासकामांचा समावेश आहे.
या निधीमुळे आंबेडकर नगरातील विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी सुसज्ज सुविधा उपलब्ध होणार असून, परिसराच्या शैक्षणिक व सामाजिक विकासाला मोठी चालना मिळणार आहे. शासनाच्या या निर्णयाचे पिंपरणे ग्रामस्थांनी उत्स्फूर्त स्वागत केले आहे.
या निधी मंजुरीबद्दल पिंपरणे सरपंच उपसरपंच सदस्य आणि ग्रामस्थांच्या वतीने राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, संगमनेरचे आमदार अमोल खताळ, भाजप अश्वी मंडल प्रमुख गोकुळ दिघे तसेच शिवसेना नेते काकासाहेब गायकवाड यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले आहेत.
