चार वर्षांचे प्रेमसंबंध; लग्न करण्यास मुलीचा नकार परंतु मुलगा लग्नास तयार, तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल ; आळे आणि संगमनेर परिसरात मोठी खळबळ
संगमनेर:
चार वर्षे प्रेमसंबंधात असलेल्या एका तरुणीने लग्न करण्यास नकार दिला असला तरी मुलगा मात्र लग्न करण्यास तयार आहे. मात्र, तरुणीने लग्न न केल्यास स्वतःच्या जीवाचे बरे-वाईट करण्याची मुलाने धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पीडित प्राध्यापक तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून संगमनेर येथील पोलीस ठाण्यात संबंधित तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे जुन्नर तालुक्यातील आळेफाटा आणि संगमनेर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित २५ वर्षीय तरुणी ही मूळची जुन्नर तालुक्यातील आळे येथील असून, ती संगमनेर येथील एका नामांकित फार्मसी कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये राहून प्राध्यापक म्हणून नोकरी करत होती. संबंधित तरुण आणि या तरुणीची गेल्या काही वर्षांपूर्वी ओळख झाली होती आणि पुढे या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. वर्ष २०१८ ते २०२२ या काळात त्यांच्यात प्रेमसंबंध होते.
दरम्यान, तरुणाला पुणे येथे नोकरी लागल्याने तो पुण्यात स्थायिक झाला. त्यानंतर देखील फेब्रुवारी २०२६ पर्यंत दोघेही संपर्कात असल्याचे समजते.
जुलै २०२५ पासून तरुणाने तरुणीला वारंवार फोन करण्यास सुरवात केली. “मला तुझ्याशीच लग्न करायचे आहे, जर तू लग्न केले नाहीस तर मी माझ्या जिवाचे बरेवाईट करून घेईन,” अशी धमकी तो देऊ लागला. इतकेच नव्हे तर तो तिचा वारंवार पाठलाग देखील करत होता. या त्रासाला कंटाळून पीडित तरुणीने मे २०२६ च्या सुमारास त्याच्याशी पूर्णपणे बोलणे बंद केले.
बोलणे बंद केल्याचा राग मनात धरून तरुणाने तरुणीच्या वडिलांना आणि भावाला फोन केला. “मी तिच्यावर काही पैसे खर्च केले आहेत, ते मला परत द्या. पैसे नाही दिले तर तुमच्यावर केस करीन,” अशी धमकी त्याने दिली. यानंतरही तरुणाचा त्रास थांबला नाही. त्याने तरुणीला व तिच्या कुटुंबीयांना फोनवर शिवीगाळ करत प्रचंड मानसिक त्रास दिला. तसेच, भूतकाळातील दोघांचे एकत्र असलेले फोटो तरुणीच्या वडिलांना, भावाला आणि तिच्या मैत्रिणीला व्हॉट्सॲपवर पाठवून बदनामी करण्याचा प्रयत्न केला. “माझे पैसे परत दिले नाहीत तर जीवे मारीन,” अशी धमकीही त्याने दिली. अखेर या त्रासाला कंटाळून तरुणीने पोलिसात धाव घेतली.
तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी पुणे येथील कासारसाई रोड परिसरात राहणाऱ्या संशयित तरुणाविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत. दरम्यान, या वादामुळे सदर तरुणीला कॉलेजच्या प्राध्यापक पदावरून कमी करण्यात आले असल्याची माहिती सूत्रांकडून समजते.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणात दुसरी बाजूही समोर येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मुलगी ही स्वतः मुलाच्या गेल्या ७ ते ८ वर्षांपासून संपर्कात होती. त्यामुळे तिने तक्रारीत केवळ ४ वर्षांचे प्रेमसंबंध होते असे सांगणे थोडे न पटणारे वाटते. संबंधित तरुण हा एका चांगल्या नामांकित कंपनीत उच्च पदावर नोकरीला असून तो आजही मुलीसोबत कायदेशीररीत्या लग्न करण्यास तयार आहे. मात्र, मुलीकडून अचानक नकार मिळाल्याने आणि गुन्हा दाखल झाल्याने हा तरुण सध्या प्रचंड मानसिक तणावाखाली आहे. जर या नैराश्यातून त्याने स्वतःच्या जीवाचे काही बरे-वाईट केले, तर याला जबाबदार कोण? असा गंभीर प्रश्न आता उपस्थित होत आहे.
या संपूर्ण संवेदनशील प्रकरणाची गुंतागुंत पाहता, पोलिसांनी केवळ एकतर्फी कारवाई न करता दोन्ही बाजू समजून घेऊन आणि समजुतीने हे प्रकरण मार्गी लावावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
