1. शेतकऱ्याला दमदाटी, मंत्र्यांचा एकेरी उल्लेख!  आय फायनान्सच्या मॅनेजर दातीर यांच्या अरेरावीने संगमनेरमध्ये संतापाचा उद्रेक; गुन्हा दाखल करून बडतर्फीची मागणी!

कर्जदार शेतकऱ्याशी उद्धट भाषा; मंत्री बावनकुळे यांच्याबद्दलही अपमानास्पद वक्तव्य केल्याचा आरोप

संगमनेर :

शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणींचा गैरफायदा घेत कर्जवसुलीच्या नावाखाली दमदाटी केली जात असल्याचा गंभीर प्रकार संगमनेर शहरातील आय फायनान्स कंपनीच्या मॅनेजर दातीर यांच्या कथित संभाषणातून समोर आला आहे. जोर्वे येथील एका कर्जदार शेतकऱ्याशी अरेरावीच्या भाषेत बोलतानाच राज्याचे महसूल मंत्री बावनकुळे साहेब यांच्याबद्दलही एकेरी शब्दांचा वापर करून अपमानास्पद भाषा केल्याचा आरोप होत आहे. या संभाषणाची ऑडिओ रेकॉर्डिंग सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

शासनाने दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देण्याची भूमिका घेतली असताना, दुसरीकडे फायनान्स कंपन्यांकडून कर्जदार शेतकऱ्यांना मानसिक त्रास दिला जात असल्याचे चित्र समोर येत आहे. कर्जदार शेतकऱ्यांना त्रास देऊ नये, अशा सूचना महसूल मंत्री बावनकुळे साहेबांनी दिल्याचे जोर्वे येथील शेतकऱ्याने संबंधित मॅनेजरला सांगितले होते. मात्र, या सूचनांचा आदर करण्याऐवजी मॅनेजर दातीर यांनी मंत्र्यांचा एकेरी उल्लेख केल्याचा आरोप असून, व्हायरल रेकॉर्डिंगमध्ये संबंधित संभाषण स्पष्टपणे ऐकू येत असल्याचा दावा नागरिकांकडून करण्यात येत आहे.

शेतकरी कर्जदार असला तरी त्याचा स्वाभिमान विकलेला नाही!

कर्जाची परतफेड करण्याची जबाबदारी असली तरी कर्जदार शेतकऱ्याला अपमानित करणे, धमकावणे अथवा त्याच्याशी उद्धटपणे वागणे कोणत्याही परिस्थितीत समर्थनीय ठरू शकत नाही. शेतकरी हा देशाचा अन्नदाता असून, त्याच्या आर्थिक अडचणी समजून घेण्याऐवजी त्याला दमदाटी करणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. त्यातच शासनाच्या जबाबदार मंत्र्यांबद्दल एकेरी भाषेचा वापर झाल्याचा आरोप प्रकरणाचे गांभीर्य अधिक वाढवणारा आहे.

या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून  आय फायनान्स कंपनीचे मॅनेजर दातीर यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, त्यांच्याविरोधात योग्य ती तक्रार नोंदवून गुन्हा दाखल करावा, तसेच कंपनीने त्यांना तातडीने नोकरीतून बडतर्फ करावे, अशी जोरदार मागणी नागरिकांमधून होत आहे.

शेतकऱ्यांचा अपमान आणि मंत्र्यांचा अवमान सहन केला जाणार का?

या प्रकरणाची वरिष्ठ स्तरावर दखल घेऊन संबंधित फायनान्स कंपनीच्या कर्जवसुली पद्धतीची चौकशी करण्यात यावी. शेतकऱ्यांना न्याय मिळावा आणि भविष्यात कोणत्याही कर्जदाराला अशा प्रकारच्या दमदाटीला सामोरे जावे लागू नये, यासाठी कठोर पावले उचलण्याची मागणी जोर धरत आहे. आता संबंधित कंपनीचे वरिष्ठ अधिकारी आणि प्रशासन या गंभीर प्रकरणात कोणती भूमिका घेतात, याकडे संगमनेरकरांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!