राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देत रत्नाकर शेजवळ यांची गुजरातमध्ये सद्भावना यात्रा!

सरदार पटेल यांच्या १५१ व्या जयंती व राष्ट्रीय एकता दिनानिमित्त ‘सारे भेद सोडूया, माणूस माणूस जोडूया’चा जागर

नाशिक रोड / गुजरात :

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त आणि राष्ट्रीय एकता दिनाचे औचित्य साधून नाशिक रोड रेल्वे डाक सेवेतील खेळाडू, सायकलपटू आणि सद्भावना सायकल यात्री रत्नाकर शेजवळ यांनी गुजरातमध्ये विशेष सद्भावना यात्रेद्वारे सामाजिक एकता, बंधुभाव, शांतता आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यास सुरुवात केली आहे.

‘सारे भेद सोडूया, माणूस माणूस जोडूया’ हा यात्रेचा मुख्य संकल्प असून, गुजरातमधील उनाई माता मंदिर, एकता नगर येथील जगातील सर्वात उंच पुतळा स्टॅच्यू ऑफ युनिटी, सरदार सरोवर, नीलकंठ धाम पोईचा, कुबेर भंडारी मंदिर (करणाली), पावागड आदी धार्मिक, ऐतिहासिक आणि पर्यटनस्थळांच्या परिसरात ते नागरिकांमध्ये जनजागृती करत आहेत.

सरदार वल्लभभाई पटेल यांनी देशातील विविध संस्थानांचे एकत्रीकरण करून राष्ट्रीय एकात्मतेचा पाया मजबूत केला. त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन समाजातील जात, धर्म, भाषा, प्रांत आणि इतर भेदभाव दूर करून माणसामाणसांमध्ये प्रेम, विश्वास, आपुलकी आणि बंधुभाव निर्माण व्हावा, हा या यात्रेमागील प्रमुख उद्देश आहे.

विशेष म्हणजे, रत्नाकर शेजवळ हे स्वतः श्रवण दिव्यांग असूनही आपल्या दिव्यांगत्वावर मात करत गेली अनेक वर्षे शासकीय सेवेसोबतच क्रीडा, सायकलिंग, मॅरेथॉन, गिर्यारोहण आणि सामाजिक जनजागृतीच्या क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र पोस्ट विभागाचे प्रतिनिधित्व करत त्यांनी १४ वेळा अखिल भारतीय टपाल सायकलिंग स्पर्धांमध्ये सहभाग घेतला असून सुवर्ण, रौप्य व कांस्य पदकांची कमाई केली आहे.

देशातील विविध राज्यांमध्ये आणि परदेशातही सायकल यात्रांच्या माध्यमातून त्यांनी शांतता, सद्भावना, राष्ट्रीय एकात्मता आणि दिव्यांग सक्षमीकरणाचा संदेश पोहोचवला आहे.

दिव्यांगत्व ही मर्यादा नसून जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर समाजासाठी मोठे कार्य करता येते, हे रत्नाकर शेजवळ आपल्या कृतीतून दाखवून देत आहेत. सरदार पटेल यांच्या राष्ट्रीय एकात्मतेच्या विचारांना अभिवादन करत गुजरातच्या भूमीतून ते मानवतेचा आणि माणुसकीचा संदेश देत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!