संगमनेरला छत्रपती शिवाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय मंजूर करावे – आत्माराम देशमुख यांची मागणी
संगमनेर
नगरेची रचावी, जलाशय निर्मावी, महावने लावावी निरंतर – विश्वमाऊली संत ज्ञानेश्वर महाराज
संगमनेर येथे छत्रपती शिवाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (एम.बी.बी.एस.) तसेच त्यास जोडून अद्ययावत सर्व सोयींयुक्त जिल्हा शासकीय रुग्णालय उभारण्यात यावे, अशी मागणी चिखली (पिंपरणे), ता. संगमनेर येथील रहिवासी आत्माराम गजानन देशमुख यांनी महाराष्ट्र शासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.
यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री मा. ना. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री मा. ना. एकनाथ शिंदे, मा. ना. अजितदादा पवार, पालकमंत्री मा. ना. राधाकृष्ण विखे पाटील, विधानपरिषद सभापती मा. प्रा. राम शिंदे तसेच वैद्यकीय शिक्षण मंत्री मा. ना. गिरीष महाजन यांच्याकडे निवेदन सादर केले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, संगमनेर हे भौगोलिकदृष्ट्या मध्यवर्तीच्या
दृष्टीने अहिल्यानगर शहराच्या बरोबरीचे महत्त्वाचे ठिकाण आहे. संगमनेर तालुका तसेच आजूबाजूच्या अकोले, राजूर, कोपरगाव, नेवासा आदी तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात दुर्गम, डोंगराळ व आदिवासी भाग असून या भागातील गोरगरीब रुग्णांना सध्या नाशिक, पुणे किंवा अहिल्यानगर येथे उपचारासाठी जावे लागते. त्यामुळे आर्थिक व शारीरिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
संगमनेर येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व त्यास जोडलेले जिल्हा रुग्णालय उभारण्यात आल्यास स्थानिक नागरिकांसह दुर्गम भागातील रुग्णांना दर्जेदार व मोफत उपचार मिळतील. तसेच वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीही ही सुवर्णसंधी ठरेल. नाशिक, पुणे व मुंबईच्या धर्तीवर अद्ययावत सुविधा असलेले रुग्णालय उभारल्यास या संपूर्ण भागाच्या आरोग्य व शैक्षणिक विकासाला मोठी चालना मिळेल, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
शासनाने या मागणीचा सकारात्मक विचार करून संगमनेरच्या विकासासाठी तातडीने निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा आत्माराम देशमुख यांनी व्यक्त केली आहे.
