अंबाजोगाईत महेश नवमी उत्साहात साजरी
अंबाजोगाई / लोकवेध live न्यूज / सुरेश मंत्री
माहेश्वरी समाजाचा उत्पत्तीदिन ‘महेश नवमी’ दि. १५ जुन रोजी अंबाजोगाई तालुका माहेश्वरी समाजाच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते तसेच अंबाजोगाई शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेने शहरातील नागरिकांचे लक्ष वेधून घेतले होते.
याबाबत सविस्तर असे की, माहेश्वरी समाजाचा उत्पत्ती दिन ‘महेश नवमी’ दरवर्षी सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा होत असतो. यावर्षीही अंबाजोगाई तालुका माहेश्वरी समाजाच्या वतीने दि. १५ जुन रोजी महेश नवमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. समाजाच्या वतीने दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी येथील केदारेश्वर मंदिरात महारुद्राभिषेक करण्यात आला. यानंतर या मंदिर परिसरातच वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी समाजाच्या विविध संघटनांनी उत्साहाने सहभागी होऊन वृक्षारोपण केले. यानंतर येथील राजस्थानी मंगल कार्यालयात रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.या रक्तदान शिबीरात ४५ युवकांनी रक्तदान केले. यानंतर दुपारी महेश पूजन करण्यात आले. यावेळी महिलांनी ‘एकत्र परिवार, गांव के संस्कार, जीवन हो साकार’ ही नाटीका सादर केली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नंदकिशोर भन्साळी, विष्णुदासजी काकानी, विजयकुमारजी सोनी, गिताबाई जाजू, सुलोचना बियाणी उपस्थित होते. यानंतर संध्याकाळी शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. ढोल पथक, बाल वारकरी मंङळ, सुशोभित रथात बसलेले उमा-महेश यांनी शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले होते. ही शोभायात्रा राजस्थानी मंगल कार्यालयापासून सुरुवात होऊन शिवाजी चौक, मंगळवार पेठ, बसस्थानक स्थानक मार्गाने संपन्न झाली. या शोभायात्रेत समाजातील शेकडो महिला, पुरुष, युवकांनी सहभाग घेतला होता. कार्यक्रमाच्या सांगता स्नेह भोजनाने झाली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माहेश्वरी सभा, माहेश्वरी महिला संघटन, माहेश्वरी किशोरी संघटन व माहेश्वरी युवा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले.
