“गावातील तरुणांचे भविष्य मटक्याच्या विळख्यात! रोहम वस्तीवरील अवैध धंदा बंद करा; ग्रामस्थांचा आंदोलनाचा एल्गार

 तरुणांचे संसार उद्ध्वस्त; ग्रामस्थांचा संतप्त इशारा, दिवाळीनंतर मटका बंद करा अन्यथा तीव्र आंदोलन!

संगमनेर / प्रतिनिधी

संगमनेर तालुक्यातील पिंपरणे गावातील रोहम वस्ती परिसरात मटक्याचा अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून होत असून, या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. मटक्याच्या आहारी जाऊन अनेक तरुण आर्थिक संकटात सापडत असून, काही कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त होण्याची वेळ आल्याची गंभीर बाब ग्रामस्थांनी पुढे आणली आहे.

विशेष म्हणजे, हा मटक्याचा व्यवसाय रस्त्याच्या कडेला सुरू असल्याने शाळेत ये-जा करणारी लहान मुले दररोज हा प्रकार पाहत आहेत. बालवयातच अशा चुकीच्या गोष्टींचा प्रभाव मुलांवर पडण्याची भीती व्यक्त होत असून, भविष्यात त्याचे गंभीर सामाजिक परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एका बाजूला तरुण पिढीला व्यसनमुक्त करण्यासाठी प्रयत्न केले जात असताना दुसरीकडे गावातच मटक्यासारख्या अवैध व्यवसायाला खुलेआम वाव मिळत असेल, तर याला जबाबदार कोण? असा संतप्त सवाल ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत.

मटका व्यवसायाला नेमके अभय कोणाचे? प्रशासनाचे दुर्लक्ष की स्थानिक पातळीवरील पाठबळ?

रोहम वस्तीवरील हा मटका तातडीने बंद करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. दिवाळी सणानंतरही हा अवैध व्यवसाय सुरू राहिल्यास ग्रामस्थांच्या वतीने तीव्र आंदोलन उभारण्यात येईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.

मटका चालविणाऱ्यांनी ग्रामस्थांच्या भावनांची आणि गावातील तरुण पिढीच्या भविष्याची दखल घेऊन दिवाळीनंतर तात्काळ हा व्यवसाय बंद करावा. अन्यथा होणाऱ्या आंदोलनाची जबाबदारी संबंधित मटका चालक आणि प्रशासनाची राहील, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.

आता पोलीस प्रशासन या गंभीर प्रकाराची दखल घेऊन प्रत्यक्ष कारवाई करणार का? की ग्रामस्थांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागणार? याकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!