एस. आर. थोरात मिल्क प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड तर्फे दूध उत्पादक शेतकऱ्यांना १७ कोटी ३१ लाख रुपयांचे वाटप; शेतकरी हिताचे विविध उपक्रम
संगमनेर :
एस. आर. थोरात मिल्क प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड या दूध उद्योग समूहाने दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या आर्थिक हिताला प्राधान्य देत दूध दरफरक, ३१ ऑक्टोबर पर्यंतचे आगाऊ पेमेंट, वाहतूक भाडे, वितरक कमिशन, कर्मचारी पगार आणि बोनस अशा विविध माध्यमांतून एकूण १७ कोटी ३१ लाख रुपयांची रक्कम दूध उत्पादक सभासदांच्या बँक खात्यावर वर्ग केली आहे. शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळावे यासाठी गेली ३३ वर्षे समूह सातत्याने प्रयत्नशील आहे. अशी घोषणा संस्थेचे चेअरमन मा. श्री. आबासाहेब थोरात यांनी केली.
तसेच थोरात डेअरीने नेहमीच गुणवत्तापूर्ण दूध संकलन, स्वच्छता आणि पारदर्शक व्यवहारांच्या माध्यमातून शेतकरी व ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे. महाराष्ट्रात दूध व दुग्धजन्य पदार्थांमधील भेसळ व बनावटपणाला आळा घालण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त मा. श्री. तुकाराम मुंढे साहेब यांनी केलेल्या प्रभावी कार्यवाहीमुळे शुद्ध व गुणवत्तापूर्ण दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची मागणी वाढण्यास मदत झाली आहे. याचा सकारात्मक परिणाम दूध उत्पादक शेतकऱ्यांवर झाला असून, त्यांना वर्षभर उच्चांकी व सातत्यपूर्ण दूध खरेदी दर देणे शक्य झाले.
चालू आर्थिक वर्षातही दूध उत्पादनाचा खर्च आणि शेतकऱ्यांचे आर्थिक हित लक्षात घेऊन वर्षभर स्थिर व उच्च दूध खरेदी दर देण्यावर समूहाने विशेष भर दिला आहे. तसेच, शेतकऱ्यांचा पशुखाद्यावरील खर्च कमी करण्याच्या दृष्टिकोनातून २५ टक्के प्रथिने असलेले ‘गगनगिरी डायमंड’ आणि २२ टक्के प्रथिने असलेले ‘गगनगिरी गोल्ड’ हे पशुखाद्य वाजवी दरात उपलब्ध करून देण्यात आले आहे.
बैठकीस संबोधित करताना संस्थेचे संचालक श्री. पृथ्वीराज थोरात यांनी सध्या निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीमुळे पाणीटंचाई, जनावरांसाठी पुरेसा चारा उपलब्ध करणे आणि पशुधनाचे आरोग्य जपणे ही शेतकऱ्यांसमोरील प्रमुख आव्हाने असल्याचे नमूद केले. सद्यस्थितीतील दुष्काळाचे परिणाम केवळ पुढील पावसाळ्यापर्यंत मर्यादित न राहता शेतीचे उत्पादन पूर्वपदावर येऊन संपूर्ण कृषी उत्पादन चक्र सुरळीत होईपर्यंत जाणवू शकतात. मागील काही वर्षांतील अनुभव पाहता, एका दुष्काळी हंगामाचा परिणाम सलग दोन हंगामांवर झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी दीर्घकालीन परिस्थितीचा विचार करून जनावरांसाठी पाणी व चारा नियोजन, पशुसंवर्धन आणि उपलब्ध शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे नियोजन करावे, असे आवाहन त्यांनी केले.
संचालक मा. श्री. देवराज थोरात यांनी माहिती देताना दुग्धव्यवसायातील आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढावा आणि पशुपालकांना शास्त्रीय पद्धतीने मार्गदर्शन मिळावे, यासाठी उद्योग समूहामार्फत जनावरांचे संगोपन, योग्य आहार व्यवस्थापन, आरोग्याची काळजी आणि दूध उत्पादनवाढ याविषयी माहितीपर व्हिडिओ तयार करून सर्व सोशल मीडिया माध्यमांवर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. शासनाच्या विविध योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी समूहाचे ‘मी शेतकरी’ आणि ‘संकलन पॉईंट’ या अॅपच्या माध्यमातून महत्त्वाचे अपडेट्स दिले जात आहेत.
दिवाळीच्या शुभेच्छा :एस. आर. थोरात डेअरीच्या वतीने सर्व दूध उत्पादक शेतकरी बांधव, पशुवैद्यकीय डॉक्टर तसेच दुग्धव्यवसायाशी संबंधित सर्व घटकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा! सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि भरभराट नांदो, अशी सदिच्छा संस्थेचे चेअरमन यांनी व्यक्त केली.
