*”मी माझी चड्डी जिथं फाटते तिथंच शिवतो!” – चेतन घुले यांचा विरोधकांना खोचक टोला!*
सहकारी संस्थांच्या चेअरमन आणि व्हाईस चेअरमन निवडींवरून विरोधकांच्या राजकीय अस्तित्वाच्या धडपडीवर घणाघात; खुर्च्यांचे राजकारण करून जनाधार मिळत नसतो..!
धांदरफळ (प्रतिनिधी) —
संगमनेर तालुक्यातील राजहंस दूध संघाच्या चेअरमनपदी पश्चिम पट्ट्यातील रमेश गुंजाळ यांची झालेली निवड आणि त्यापूर्वी संगमनेर सहकारी साखर कारखान्याच्या व्हाईस चेअरमनपदी पांडुरंग घुले यांची केलेली निवड, या दोन्ही घडामोडी म्हणजे विरोधकांच्या राजकीय अस्तित्वाची धडपड आणि ढासळत चाललेला राजकीय पाया वाचवण्यासाठी सुरू असलेली केविलवाणी धडपड आहे, अशी घणाघाती टीका शिवसेना-भाजपा महायुतीचे (धांदरफळ गट) चेतन घुले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.
प्रसिद्धीपत्रकात घुले यांनी म्हटले आहे की, आमदार अमोल खताळ हे धांदरफळचे सुपुत्र असून, त्यांच्या वाढत्या जनसंपर्कामुळे, विकासकामांच्या धडाक्यामुळे आणि जनतेतील वाढत्या लोकप्रियतेमुळे विरोधकांच्या पोटात गोळा उठला आहे. त्यामुळेच आमदारांच्या वाढत्या राजकीय प्रभावाला रोखण्यासाठी सहकारी संस्थांच्या खुर्च्यांभोवती राजकीय कोंडाळे करून क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, खुर्च्या वाटून जनाधार निर्माण होत नसतो आणि राजकीय डावपेच आखून जनतेचा कौल बदलता येत नसतो, हे विरोधकांनी लक्षात ठेवावे.
ज्या पांडुरंग घुले यांना स्वतःच्या गावात ठोस कामगिरी करता आली नाही, गावातील स्थानिक संस्था सक्षमपणे चालवता आल्या नाहीत, साधी दूध डेअरीसुद्धा गावात उभी करता आली नाही, अशा व्यक्तीच्या गळ्यात कारखान्याच्या व्हाईस चेअरमनपदाची माळ घालून नेमके कोणते राजकीय गणित साधले जात आहे? असा सवालही चेतन घुले यांनी उपस्थित केला. स्वतःच्या गावात जनतेचा विश्वास संपादन करता आला नाही, त्यांनी मोठ्या संस्थांमधील पदांच्या माध्यमातून जनाधार असल्याचा आव आणू नये, असा टोलाही त्यांनी लगावला.
पुढे बोलताना घुले म्हणाले की, आमदार अमोल खताळ हे कोणत्याही सहकारी संस्थेच्या कर्मचाऱ्यांच्या किंवा पदाधिकाऱ्यांच्या जोरावर निवडून आलेले नाहीत. ते थेट सर्वसामान्य जनतेच्या मतांवर निवडून आले आहेत. त्यांचा जनाधार हा जनतेच्या विश्वासातून निर्माण झालेला आहे. त्यामुळे कुणी कितीही राजकीय खेळ्या केल्या, कितीही खुर्च्यांची बेरीज-वजाबाकी केली, तरी जनतेने दिलेला कौल पुसता येणार नाही.
या राजकीय घडामोडींवर भाष्य करताना त्यांनी दिवंगत अभिनेते दादा कोंडके यांच्या एका गाजलेल्या संवादाचा दाखला दिला. दादा कोंडके यांना कोणीतरी विचारले होते की, “तू चड्डी कुठे शिवतोस?” त्यावर दादांनी मिश्किलपणे उत्तर दिले होते, “मी माझी चड्डी जिथं फाटते तिथंच शिवतो!” अगदी त्याच धर्तीवर सध्या विरोधकांची अवस्था झाली असून, जिथे राजकीय अस्तित्वाला तडा जात आहे, तिथेच पदांची मलमपट्टी करून अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न सुरू असल्याची खोचक टिप्पणी चेतन घुले यांनी केली.
राजकारण म्हणजे खुर्च्यांचा खेळ नाही, तर जनतेच्या विश्वासाची लढाई आहे! सहकारी संस्थांमध्ये पदे वाटून त्या पदाधिकाऱ्यांच्या जिवावर कुणी मोठा लोकनेता होत नसतो. जनतेच्या सुख-दुःखात उभे राहावे लागते, गावासाठी काम करावे लागते आणि लोकांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरावे लागते. केवळ पदांच्या माध्यमातून राजकीय वजन दाखवण्याचे दिवस आता संपले आहेत. तालुक्यातील जनता सुज्ञ आहे; कोण काय करत आहे, कोण कुणासाठी राजकीय खेळ्या खेळत आहे आणि कोणाला आपले अस्तित्व वाचवायचे आहे, हे जनतेला चांगलेच समजते.
विरोधकांनी कितीही राजकीय क्षेत्ररक्षण करावे, कितीही खुर्च्यांची मांडणी करावी; आम्ही मात्र जनतेच्या मैदानात जनतेच्या ताकदीवर लढणार! कुणाच्या दबावाला झुकणार नाही आणि कुणाच्या राजकीय डावपेचांना घाबरणार नाही. कारण आमची ताकद कोणतीही खुर्ची, संस्था किंवा पद नसून सर्वसामान्य मायबाप जनता आहे, असा ठाम निर्धारही चेतन घुले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे व्यक्त केला आहे.
