दुष्काळ हटू दे, शेतकऱ्यांच्या जीवनात सुख येऊ दे!
आमदार अमोल खताळ यांची बिरोबा महाराजांच्या चरणी प्रार्थना; यात्रेत मानाच्या काठीची मिरवणूक
संगमनेर/ प्रतिनिधी
सध्या शेतकरी राजा दुष्काळाच्या संकटाचा सामना करत असून, हे संकट लवकरात लवकर दूर होऊन शेतकऱ्यांच्या जीवनात पुन्हा सुखाचे दिवस यावेत, शेतकरी बांधवांच्या कष्टाला चांगले फळ मिळावे, अशी प्रार्थना आमदार अमोल खताळ यांनी धांदरफळ येथील बिरोबा महाराजांच्या चरणी केली.
संगमनेर तालुक्यातील धांदरफळ खुर्द येथे बिरोबा महाराजांचा यात्रा उत्सव भक्तिमय वातावरणात सुरू झाला आहे. यात्रेच्या पार्श्वभूमीवर आमदार खताळ यांच्या विकास निधीतून सुमारे १५ लाख रुपये खर्च करून अवघ्या चार दिवसांत तयार करण्यात आलेल्या काँक्रिटीकरण रस्त्याचे लोकार्पण आमदार खताळ आणि गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आले. या विकासकामामुळे यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांना मोठी सुविधा उपलब्ध होणार असून, गावाच्या पायाभूत सुविधांमध्येही भर पडली आहे. यावेळी गावातून निघालेल्या मानाच्या काठीची आमदार खताळ यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली. त्यानंतर डफ व विविध वाद्यांच्या गजरात मानाच्या काठीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत गुलाल आणि भंडाऱ्याची मुक्त उधळण करण्यात आली. बिरोबा महाराजांच्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता.
मिरवणुकीत आमदार अमोल खताळ यांनी स्वतः उत्स्फूर्त सहभाग घेतला. मानाच्या काठीच्या मिरवणुकीत सहभागी होत त्यांनी काठी नाचविण्याचाही आनंद घेतला. यात्रेच्या काळात भाविकांची मोठी गर्दी होत असल्याने रस्त्याची आवश्यकता लक्षात घेऊन आमदार खताळ यांच्या विकास निधीतून सुमारे १५ लाख रुपये खर्च करून काँक्रिटीकरण रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आले. अवघ्या चार दिवसांत रस्त्याचे काम पूर्ण झाल्याने ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. यावेळी बिरोबा महाराज देवस्थान ट्रस्टच्या वतीने आमदार अमोल खताळ यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमास धांदरफळ खुर्द येथील ग्रामस्थ, भाविक आणि महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
