बिबट्यांचा वावर असलेल्या भागांत वनविभागाची यंत्रणा सज्ज ठेवा
आमदार अमोल खताळ यांच्या सूचना; वनभवन, वनपर्यटन विकासकामांचा आढावा
संगमनेर/ प्रतिनिधी
मानव-बिबट संघर्षाच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी वनविभागाने अधिक सतर्क राहून प्रभावी उपाययोजना कराव्यात. बिबट्यांचा वावर असलेल्या भागांमध्ये आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यासह आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवावी, अशा सूचना आमदार अमोल खताळ यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
संगमनेर येथील सहाय्यक वनसंरक्षक (प्रादेशिक) यांच्या कार्यालयात शुक्रवार (दि. २०) वनविभागाच्या कामकाजाचा आमदार खताळ यांनी आढावा घेतला. या बैठकीत प्रस्तावित वनभवन इमारतीचे काम तसेच निझर्णेश्वर, पेमगिरी आणि बाळेश्वर येथील वनपर्यटन विकासकामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. संबंधित कामांची सद्यस्थिती जाणून घेत वनविभागाच्या विविध उपक्रमांवर चर्चा करण्यात आली.
मानव-बिबट संघर्ष रोखण्यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मागील वर्षी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून वनविभागाला आवश्यक साहित्य व साधनसामग्री उपलब्ध करून देण्यात आली होती. यामध्ये बिबट बचाव वाहने, ड्रोन, बंदुका आणि पिंजऱ्यांचा समावेश आहे. बिबट्यांचा वावर असलेल्या भागांमध्ये नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणे, बिबट्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवणे आणि आपत्कालीन परिस्थितीत तातडीने बचावकार्य राबविणे यासाठी उपलब्ध साधनसामग्रीचा प्रभावी वापर करण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. मानव-बिबट संघर्षाच्या घटना रोखण्यासाठी वनविभागाने समन्वयाने काम करावे, अशा सूचनाही देण्यात आल्या.
बिबट्यांना सुरक्षितपणे जेरबंद करण्यासाठी प्रशिक्षित असलेल्या संगमनेरच्या बिबट बचाव पथकाने केलेल्या कार्याची दखल घेत या पथकाचा सत्कार करण्यात आला. बिबट्यांचा वावर असलेल्या परिसरात निर्माण होणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीत प्रशिक्षित पथकाची भूमिका महत्त्वाची ठरते. त्यामुळे या पथकाने आवश्यक प्रशिक्षण, दक्षता आणि उपलब्ध साधनसामग्रीच्या मदतीने आपले कार्य अधिक प्रभावीपणे पार पाडावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
जंगल परिसरातील पाणवठे सुस्थितीत ठेवणे, पाण्याची उपलब्धता तपासणे आणि वन्यजीवांना पाण्यासाठी मानवी वस्त्यांकडे येण्याची वेळ कमी करण्यासाठी आवश्यक नियोजन करण्यावरही भर देण्यात आला. वनविभागाने वन्यजीव संरक्षणासह नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सातत्याने दक्ष राहून काम करावे, असेही आमदार अमोल खताळ यांनी सांगितले. या बैठकीस सहाय्यक वनसंरक्षक अमरजित पवार, वनपरिक्षेत्र अधिकारी मोहन ताम्हाणे, नम्रता हिरे यांच्यासह वनविभागातील सर्व वनपाल, वनरक्षक, वनमजूर आणि कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.
