अवैध वाळू उपसा करणार्‍या 8 जणांना तहसिलदारांकडून पाठविलेल्या नोटीसांनी खळबळ!

महसूल पथकावर गस्त ठेवणार्‍यांनाही नोटीसा पाठविणार- तहसिलदार; अवैध वाळू उपश्यांवर धडाकेबाज कारवाया सुरूच..

 संगमनेर / लोकवेध live न्यूज 

संगमनेर तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध वाळूचा उपसा सुरू असून नुकत्याच तहसिलदार मांजरे यांनी अवैध वाळूचा उपसा करणार्‍या 8 जणांना कारवाया का करू नये? अशा नोटीसा पाठविल्या यामुळे खळबळ उडाली आहे वाळू उपसा करणार्‍यांना तहसिलच्या महसूलच्या पथकाची हेरगिरी करणार्‍यांनाही नोटीसा देणार असेही तहसिलदार धीरज मांजरे यांनी सांगितले. संगमनेर तालुक्यात रोज रात्री प्रशासनाला चकवा देत वाळूतस्कर प्रवरा नदीपात्रातून रोज बेकायदेशीर वाळू उपसा करत आहेत. याला कुठेतरी आळा बसावा याकरिता महसूल विभागाकडून अनेकदा प्रयत्न झाले. परंतु ते प्रयत्न फोल झाल्याचे दिसत आहे. आता अवैध वाळू उपसा व वाहतुकीवरून संगमनेरचे तहसीलदार धीरज मांजरे अ‍ॅक्शन मोडवर आले आहेत. त्यांनी वाळू उपसा करणार्‍या संगमनेर खुर्दमधील आठ जणांना दंडात्मक कारवाई करण्याबाबत नोटिसा बजावल्या आहेत. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. संगमनेरातील पाटीलमळा येथील प्रसाद गुंजाळ यांच्या शेतातून रात्रीच्यावेळी आणि साई अमृत पेट्रोल पंपजवळील रस्त्याने रात्रीच्यावेळी समीर शेख, अझर खान, संजय वाकचौरे, धनंजय गोसावी, हर्षल शेजूळ, लक्ष्मण गोसावी, अभिजीत शिंदे, प्रसाद गुंजाळ हे अनधिकृतपणे वाळू उपसा करून वाहतूक करत असल्याचा अहवाल कामगार तलाठी यांनी तसीलदारांना सादर केला होता. त्याची दखल घेऊन तहसीलदार मांजरे यांनी आपल्यावर दंडात्मक कारवाई का करू नये? अशी विचारणा ’करत दोन दिवसांत खुलासा सादर करण्यास सांगितले आहे. जर मुदतीत खुलासा सादर केला नाही तर दंडात्मक कारवाईचा इशारा नोटिशीतून दिला आहे. यामुळे वाळूतस्करांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.दरम्यान, संबंधित वाळूतस्करांना नोटिसा दिल्या आहेत. संशयास्पद रात्रीच्यावेळी जे लोक नदीकाठी वाळू चोरी अथवा महसूल पथकावर गस्त ठेवणारे लोक आढळून येतील अशा लोकांवर देखील सीआरपीसी 109 प्रमाणे कारवाई करण्यात येईल. तसेच तालुक्यातील नदीलगत वाळू चोरी करणार्‍या संबंधित वाळूची वाहतूक करणारे यांची माहिती घेऊन त्यांना देखील नोटिसा पाठवणार आहे. धीरज मांजरे, तहसीलदार, संगमनेर यांनी सांगितले. दरम्यान, अवैध वाळू तस्करी करणारी टाटा कंपनीची झेनॉन गाडी (एम.एच.42 बी.4026) तालुका पोलिसांनी जप्त करत दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. रविवारी मध्यरात्री तालुक्यातील पिंपरणे येथील जोर्वे रोडवर कारवाई करत 1 लाख 5 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. कॉन्स्टेबल बाबासाहेब केशव शिरसाठ त्यांच्या फिर्यादीवरून फरार झेनॉन गाडी चालक व मालक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक देवीदास ढुमने यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असून फरार चालक व मालकाचा पोलीस शोध घेत आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!