नवजात लेकी ने फोडले आई-वडिलांच्या बालविवाहाचे गुपित …
बलात्कारासह पोक्सो अंतर्गत पाच जणांवर गुन्हा दाखल…
संगमनेर / लोकवेध live न्यूज 
बाळंतपणासाठी रुग्णालयात दाखल केलेल्या गर्भवतीच्या कागदपत्रांवरुन ती अल्पवयीन असल्याची बाब वैद्यकिय अधिकाऱ्याच्या लक्षात आली. प्रसुतीनंतर तिने छोट्याशा लहान मुलीला जन्मही दिला. मात्र या गंभीर प्रकरणाची माहिती संबंधित डॉक्टरांनी तातडीने पोलिसांना दिल्याने, लक्ष्मीच्या आगमानाचा आनंद साजरा करण्याऐवजी तिचा पती, सासु सासरे व आई वडिलांना तुरुंगाची हवा खावी लागल्याची घटना संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील एका गावात घडली.
या बाबत अधिक माहिती अशी, पठार भागातील एका गावातील मातेने आपल्या उपवर मुलासाठी नात्यातीलच भावाची मुलगी सुन म्हणून पसंद केली. दिड वर्षांपूर्वी त्यांच्या राहत्या घरासमोर मांडव टाकून रिती भातीप्रमाणे विवाह उरकण्यात आला. आत्याच्या घरी नांदण्यासाठी आलेल्या मुलीला दिवस गेले. घरात नवीन सदस्याच्या आगमनाने आनंदलेल्या सासरच्या कुटूंबाने तिन चार दिवसांपूर्वी तिला प्रसुतीसाठी लोणीच्या एका रुग्णालयात दाखल केले. तेथे नोंदणी करताना कागदपत्रे व इतर बाबींवरुन गर्भवती मुलीचे वय कमी असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले. दरम्यान ती प्रसुत होऊन तिला मुलगी झाली. मात्र डॉक्टरांनी आपले कर्तव्य व्यवस्थित बजावल्याने या बालविवाहाची माहिती पोलिसांना समजली.
पीडितेच्या घारगाव पोलीस ठाण्यातील जबाबावरुन पोलिसांनी तिचा पती, सासु सासरे व मुलीच्या आई वडिलांना या बालविवाह प्रकरणात दोषी धरले असुन, त्यांच्यावर बलात्कार, बालविवाह प्रतिबंध आणि पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
——————————
चौकट ः
प्रसुतीमुळे अकस्मात या बालविवाहाची माहिती समोर आल्याने पोलिसही चक्रावले आहेत. अद्यापही खेड्यापाड्यात असे प्रकार घडत असल्याने या बाबतीत समुपदेशन करण्यात प्रशासन तोकडे पडत असल्याची बाबही समोर आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!