संगमनेरला रविवारी ई एस आय एस सेवा दवाखान्याचे आरोग्य मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयाचीही आरोग्यमंत्री पाहणी करणार
संगमनेर | प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटीच्या वैद्यकीय प्रशासन अधिकारी कार्यालय, नाशिक यांच्या अंतर्गत संगमनेर येथे सुरू करण्यात येणाऱ्या ई एस आय एस (ESIS) सेवा दवाखान्याचे उद्घाटन रविवार दि २९ नोव्हेंबर २०२६ रोजी राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या शुभहस्ते होणार आहे. याच दिवशी आरोग्यमंत्री आबिटकर हे घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयाचीही पाहणी करणार आहे
संगमनेर शहर आणि तालुक्यातील कामगार, कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी आरोग्य विषयक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने ई एस आय एस सेवा दवाखाने सुरू करण्यात आले आहे .या सेवा दवाखान्यामुळे कामगार लाभार्थ्यांना वैद्यकीय सेवा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
संगमनेरमध्ये आमदार अमोल खताळ पाटील यांच्या सततच्या पाठ पुराव्यातून संगमनेरमध्ये सेवा दवाखाना सुरू होत आहे.या सेवादवाखान्याचा शुभारंभ राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते होणार आहे अध्यक्षस्थान राज्याचे जलसंपदामंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे भूषविणार आहेत. यावेळी आमदार अमोल खताळ पाटील तसेच महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, वैद्यकीय संचालक डॉ. अशोक थोरात,प्रशासन संचालक सोहम वायाळ आणि वैद्यकीय प्रशासन अधिकारी डॉ. अनिता भांबरे हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
तरी या कार्यक्रमाला संगमनेर शहरासह तालुक्यातील नागरिकांनी, कामगारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शिवसेना व महायुतीच्या वतीने करण्यात आले आहे.
