चाळीस वर्षांचा हिशोब मागितल्यावर काहींचा बीपी वाढतो
आमदार अमोल खताळ यांची थोरातांचे नाव न घेता टीका; धांदरफळ बुद्रुक येथे दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना साहित्य वाटप
संगमनेर/ प्रतिनिधी

अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली विकासकामे पूर्ण करण्यासाठी आणि संगमनेर तालुक्याला दहशतीतून बाहेर काढण्यासाठी जनतेने बदल घडवला आहे. चाळीस वर्षांच्या सत्तेनंतर झालेला हा बदल काहींना सहन होत नसून, चाळीस वर्षांचा हिशोब मागितल्यावर काहींचा बीपी वाढत आहे, अशी टीका आमदार अमोल खताळ यांनी माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे नाव न घेता केली.
संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे
दिव्यांग बांधव आणि ज्येष्ठ नागरिकांना साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात आमदार खताळ बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संजय मोरे सुनिता कानवडे शरद गोर्डे ऍड अविनाश वलवे नेताजी घुले अशोक कानवडे राजेंद्र देशमुख शरद गोर्डे कमलेश डेरे हरीश वलवे यांच्यासह महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
आमदार खताळ म्हणाले, जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील आणि माझ्यात मतभेद असल्याचे चित्र काहींनी रंगविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात तथ्य नाही. मंत्री विखे-पाटील आणि डॉ. सुजय विखे-पाटील यांनीही यासंदर्भात स्पष्ट भूमिका घेतली आहे. जिल्हा बँकेपुरता काही विषय होता. आगामी सर्व निवडणुका राजकीय पद्धतीनेच लढल्या जातील. त्यामुळे कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी कोणत्याही संभ्रमात राहू नये. मंत्री विखे-पाटील आणि माझ्यात भांडणे लावण्याचा काही जणांचा प्रयत्न आहे; मात्र त्यांना यश येणार नाही.
चार-साडेचार वर्षांपूर्वी ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग बांधव आणि गरजू कुटुंबांपर्यंत मदत पोहोचविण्याचा उपक्रम मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील व डॉ. सुजय विखे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला होता. अशा योजनांचा लाभ खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणे महत्त्वाचे आहे. यापूर्वी मध्यस्थ आणि दलालांच्या संस्कृतीमुळे सामान्य नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. काही ठिकाणी पैसे दिल्याशिवाय कामे होत नव्हती. मात्र, गेल्या दोन वर्षांत या पद्धतीला बऱ्यापैकी आळा घालण्याचे प्रयत्न झाले आहेत.
राजकारणात संघर्ष असतोच; मात्र विकासकामे करताना गावातील वातावरण बिघडवणे, कार्यकर्त्यांना त्रास देणे किंवा छोट्या-छोट्या कारणांवरून वाद निर्माण करणे योग्य नाही. प्रत्येकाने आपापले काम करावे. जनतेच्या प्रश्नांसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी मी ठामपणे उभा राहीन. जनहिताच्या कामात कोणी अडथळा आणत असेल, तर त्याचा सामना करण्यासाठी मी तुमच्यासोबत आहे, असे खताळ यांनी सांगितले.
निळवंडे धरण आम्ही केले, असे आम्ही कधीच म्हणत नाही. मात्र, या प्रकल्पाच्या कामाची सुरुवात तुम्ही केली असेल, तर त्याचा शेवट आम्ही केला आहे. निळवंडेच्या पाण्याचा लाभ तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
निळवंडेच्या लाभक्षेत्राबाहेरील गावांनाही सिंचनाचा लाभ कसा देता येईल, यासाठी जलसंपदा विभागाच्या बैठकीत भूमिका मांडली आहे. राज्य शासनाच्या माध्यमातून नदीजोड प्रकल्पाद्वारे सुमारे १५ टीएमसी पाणी उपलब्ध करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. त्यातून संगमनेर तालुक्यातील निळवंडे लाभक्षेत्रापासून वंचित राहिलेल्या गावांना पाणी मिळवून देण्याचा प्रयत्न राहणार असल्याचेही आमदार अमोल खताळ यांनी शेवटी सांगितले.
