संगमनेरसह जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम करणार -अबिटकर

संगमनेरला ई सी आय सी सेवा दवाखान्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते उद्घाटन;

संगमनेर/ प्रतिनिधी

कामगारांना दर्जेदार वैद्यकीय सेवा मिळावी, त्यांच्यावरील उपचारांचा आर्थिक भार कमी व्हावा आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाला चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी शासन कटिबद्ध आहे. संगमनेरमधील ईएसआयएस सेवा दवाखान्याच्या माध्यमातून कामगारांना मोठा दिलासा मिळणार असून, पुढील १५ दिवसांत आमदार अमोल खताळ यांच्यासोबत बैठक घेऊन कामगारां साठी आवश्यक आरोग्य सुविधांचा आराखडा तयार करण्यात येईल. त्यानंतर जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने काम केले जाईल, अशी ग्वाही सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली.

संगमनेर येथे महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटीच्या (ईएसआयएस) सेवा दवाखान्याचे उद्घाटन राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास आमदार अमोल खताळ, आरोग्य संचालक डॉ.विजय कंदेवाड डॉ संजय ढवळे उपसंचालक कपिल आहेर, संजय ढवळे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय घोगरे, जिल्हा आरोग्य अधिकारी बापूसाहेब नागरगोजे, वैद्यकीय अधिकारी . डॉ. मेघा आयरे प्रशासन अधिकारी रवींद्र हरणे वरिष्ठ सहाय्यक जितेंद्र परमार प्रशासनअधिकारी अनिता भांबरे, मालपाणी उद्योग समूहाचे राजेश मालपाणी, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आबासाहेब थोरात, दिलीप शिंदे, जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य तथा शिवसेनेचे विठ्ठल घोरपडे, राजेंद्र सोनवणे, विनोद सूर्यवंशी, रमेश काळे, रणजित ढेरंगे, भाजपचे तालुकाध्यक्ष गुलाब भोसले, श्रीकांत गोमासे, गोकुळ दिघे, राउफ शेख संदीप देशमुख, कैलास कासार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
ना.आबिटकर म्हणाले, कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांना आरोग्य सुविधा मिळणे हा त्यांचा अधिकार आहे. संगमनेरमधील कामगारांसाठी सुरू झालेला हा दवाखाना केवळ एका संस्थेपुरता मर्यादित न राहता आरोग्यसेवेच्या दृष्टीने महत्त्वाचा उपक्रम ठरणार आहे. या कार्यक्रमा निमित्ताने कामगारांच्या आरोग्य विषयक प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची संधी मिळाली आहे. आमदार खताळ यांनी कामगारांच्या भावना आणि त्यांच्या अडचणी प्रभावीपणे मांडल्या असून, त्यांच्या पाठपुराव्याचे आपण मनापासून अभिनंदन करतो.

संगमनेरमधील कामगारांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना आवश्यक असलेल्या आरोग्य सुविधांची माहिती घेऊन त्यानुसार नियोजन केले जाईल. पुढील १५ दिवसांत आमदार खताळ आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात येईल. या बैठकीत कामगारांसाठी कोणत्या सुविधा आवश्यक आहेत, त्यांना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो आणि त्या कशा दूर करता येतील, याचा सविस्तर आढावा घेतला जाईल. अहिल्यानगर जिल्ह्या तील सुमारे एक लाख नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याची जबाबदारी शासन आणि आरोग्य यंत्रणेची आहे. त्यामुळे केवळ संगमनेरपुरते मर्यादित न राहता संपूर्ण जिल्ह्यातील नागरिकांना आवश्यक वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील.
संगमनेरमधील आरोग्य व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी सुरू असलेल्या नवीन रुग्णालयाच्या कामाबाबतही आरोग्यमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका मांडली. नवीन इमारतीचे काम पूर्ण करून महिला आणि नवजात बालकांसाठी १०० खाटांचे अद्ययावत रुग्णालय नागरिकांच्या सेवेत आणण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल. यासाठी पुढील टप्प्यात सुमारे ४० कोटी रुपयांचा निधी देण्याबाबत नियोजन करण्यात येईल. रुग्णालयाच्या कामासाठी आवश्यक आराखडे, तांत्रिक बाबी आणि पुढील कार्यवाही निश्चित करून कामाला गती दिली जाईल. तसेच ट्रॉमा केअर सेंटरसह इतर आवश्यक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. आरोग्य व्यवस्थेतील त्रुटी दूर करणे, आवश्यक सुधारणा करणे आणि रुग्णांना अधिक चांगल्या सेवा देणे याला प्राधान्य दिले जाईल.

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून पात्र रुग्णांना उपचारांसाठी आर्थिक मदत मिळते. या योजनेचा लाभ अधिकाधिक नागरिकांना मिळावा, यासाठी संगमनेरमधील पात्र खासगी रुग्णालयांचाही योजनेत समावेश करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले. या योजनेच्या माध्यमातून पात्र रुग्णांना नियमानुसार उपचार मिळाले पाहिजेत. मात्र, योजनेचा गैरवापर करून रुग्णांकडून चुकीच्या पद्धतीने पैसे आकारले जात असतील किंवा नियमांचे उल्लंघन होत असेल, तर संबंधितांवर कारवाई केली जाईल. चांगल्या आरोग्य सुविधा देणाऱ्या रुग्णालयांना प्रोत्साहन देतानाच रुग्णांची आर्थिक पिळवणूक होणार नाही, याची दक्षता घेण्यात येईल, असेही आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले.
आमदार अमोल खताळ पाटील म्हणाले की कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या मागणीचा विचार करून संगमनेरमध्ये सेवा दवाखाना सुरू करण्यात आला असून, त्याच्या उद्घाटनासाठी राज्याचे आरोग्यमंत्री उपस्थित राहणे ही आमच्यासाठी आनंदाची बाब आहे घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयाच्या पाहणीदरम्यान आरोग्य सुविधांची माहिती घेऊन त्रुटी दूर करण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न होणे गरजेचे आहे संगमनेरमध्ये महिला व नवजात बालकांसाठी १०० खाटांचे स्वतंत्र रुग्णालय अंतिम टप्यात असून त्यास लवकरच मंजुरी मिळेल. तसेच घुलेवाडी ग्रामीण रुग्णालय परिसरातील जागेचा विचार करून सुधारित प्रस्तावाला मंजुरी द्यावी, तसेच चंदनापुरी, साकूर आणि तळेगाव दिघे परिसरातील अपघातांचे प्रमाण लक्षात घेऊन उपजिल्हा रुग्णालय उभारावे आणि शवविच्छेदनाची सुविधा उपलब्ध करून द्यावी , तसेच कर्करोगाच्या प्राथमिक तपासणी व उपचारांसाठी केंद्र सुरू करावे,
तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे व ग्रामीण रुग्णालयांमध्ये आधुनिक उपकरणे, पुरेसे मनुष्यबळ, सीटी स्कॅनसारख्या तपासणी सुविधा, सीसीटीव्ही आणि सौरऊर्जा प्रकल्प उपलब्ध करून देण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. अपघात,आणि बिबट्यांचे हल्ले आणि इतर दुर्घटनां मध्ये नागरिकांना तातडीने उपचार मिळावेत, यासाठी ग्रामीण आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्यावर अधिक भर द्यावा अशी मागणी आमदार अमोल खताळ पाटील यांनी आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे केली कार्यक्रमाला आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, मालपाणी उद्योग समूहाचे प्रतिनिधी, कामगार आणि शिवसेना महायुतीचे कार्यकर्ते लाडक्या बहिणी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता गुणे आणि प्रशांत कर्पे यांनी केले, तर आभार शिवसेनेचे जिल्हा संघटक विठ्ठल घोरपडे यांनी मानले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!