पंचवीस हजार रुपयात एक रुपयाही कमी घेणार नाही ; लाचखोर तलाठी अटक,
घरकुलासाठीवाळु पुरविण्यासाठी 25 हजार घेताना ताब्यात.!
संगमनेर / लोकवेध live न्यूज
कनोली येथील तलाठ्याने घरकुलाची वाळु नदीपात्रातुन उचलण्यासाठी 25 हजार रुपयांची मागणी केली होती. त्यात कोणत्याही प्रकारची तडजोड न करता घेईल तर 25 हजार अन्यथा काम करणार नाही. असे आरोपी संतोष शेलार या तलाठ्याने सांगितले. त्यानंतर आज 7 जुलै 2025 रोजी दुपारी नगरच्या लाचलुचपत विभागाने संगमनेर शहरातील बसस्टँड परिसरात सापळा रचला आणि लाचखोर तलाठी संतोष बाबासाहेब शेलार (रा. जनतानगर, ता. संगमनेर) याला बेड्या ठोकल्या आहेत. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम चालु आहे.
याबाबत सविस्तर
माहिती अशी की, संगमनेर तालुक्यात घरकुलांचे काम सुरू आहे. त्यामुळे, गावातील नागरिक घरकुलाच्या कागदपत्रांची पूर्तता तयार करून घरकुल मिळवत आहे. शासनाची परवानगी मिळाली की घर बांधण्यासाठी जागा तयार करत आहे. मात्र, घरकुलांच्या कामासाठी वाळू मिळत नसल्याने घरकुल धारकांना महसुल विभागातील तलाठ्याचे उंबरे झिजवावे लागत आहे. कनोली येथील घरकुल धारकांना वाळू मिळवण्यासाठी तलाठी संतोष शेलार यांच्याकडे तक्रारदार परवानगीसाठी जात होता. मात्र, विविध कारणे सांगून तलाठी वाळू उचलण्यासाठी परवानगी देत नव्हता. शासनाने घरकुलांना वाळू उचलण्यासाठी कायद्याच्या अटी व शर्ती घालुन परवानगी दिली आहे. मग, तलाठी अडवणूक का करतो? असा प्रश्न तक्रादार यांच्या मनाला पडला होता
दरम्यान, तालुक्यातील प्रवरा नदीपात्रात तसेच ओढ्यातुन, पाझर तलाव या ठिकाणांवरून तहसीलदार यांनी घरकुलाच्या कामासाठी वाळू उचलण्यासाठी परवानगी दिली आहे. गावा-गावातील पॉईंट काढुन घरकुलधारकांना सोईस्कर होईल तेथून वाळू उचलण्यासाठी परवानगी देण्यात आली. मात्र, कनोली गावातील तलाठी संतोष शेलार हा पैसे मागण्याच्या उद्देशाने अडवणूक करत होता. तक्रादार यांनी तलाठी संतोष शेलार यांना विचारले असता 25 हजार रुपयांची मागणी केली. तक्रारदार यांच्या वारंवार मागणीला वैतागल्याने त्यांनी थेट अहिल्यानगर लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली. त्यानंतर अहिल्यानगरचे पथक थेट संगमनेरात दाखल झाले. तक्रादार हे त्यांच्या मतावर ठाम होते. लाचखोर तलाठी संतोष शेलार यांनी तक्रारदाराला बसस्टैंड परिसरात बोलवले. तेथे लाचलुचपत विभागाचा सापळा रचण्यात आला. त्यावेळी तलाठी संतोष शेलार यांना 25 हजरांची लाच घेताना लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले. आज दुपारी याप्रकरणाची सखोल चौकशी सुरू होती. यात आणखी कोण आहेत का? यांनी यापूर्वी कोणाकडे अशी मागणी केली आहे का? यांच्या घरात तसेच बँकेत किती मालमत्ता आहे. आशा प्रकारची पुढील कारवाई सुरू झाली.
