बिबट्याच्या हल्ल्यात ग्रामस्थ गंभीर जखमी; वस्तीतील नागरिकांकडून सुरक्षा उपाययोजनांची मागणी

संगमनेर

कोटकर वस्ती परिसरात गुरुवारी सायंकाळी झालेल्या बिबट्याच्या हल्ल्यात श्री. अनिल पंढरीनाथ कोटकर (रा. कोटकर वस्ती) गंभीर जखमी झाले. सायंकाळी अंदाजे ७.१० वाजता ते आपल्या घरी मोटारसायकलवरून जात असताना दुतर्फा दाट झाडी असलेल्या रस्त्यावर अचानक बिबट्याने झडप घालत हल्ला केला. या हल्ल्यात बिबट्याच्या पंजाची गंभीर जखम त्यांच्या पोटाला झाली.

घटनास्थळ जिल्हा परिषद नागपूर वाडी शाळेपासून कोटकर वस्तीला जाणाऱ्या मार्गावर असून या रस्त्यावर दाट झाडी असल्याने कोटकर यांना बिबट्या दिसला नाही, अशी प्राथमिक माहिती आहे. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे ते खाली कोसळले. त्यानंतर उपस्थितांनी त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालय, घुलेवाडी येथे उपचारासाठी दाखल केले असून त्यांच्यावर आवश्यक उपचार सुरू आहेत.

या घटनेनंतर कोटकर वस्ती व परिसरातील ग्रामस्थांमध्ये मोठी भीती पसरली आहे. वाढत्या वन्यप्राण्यांच्या हालचालीमुळे नागरिकांचा जीव धोक्यात येत असल्याची भावना ग्रामस्थांमध्ये व्यक्त होत आहे. त्यामुळे संबंधित बिबट्याला तातडीने पकडण्यात यावे, असा ठाम आग्रह ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. तसेच या मार्गावरील दुतर्फा असलेली दाट झाडी तातडीने काढून टाकावी आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने स्ट्रीट लाईटची व्यवस्था करावी, अशीही मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

वनविभागाने या घटनेचा तातडीने तपास करून ग्रामस्थांच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!