सलग १९ वर्षे १० वीचा १०० टक्के निकाल; मुख्याध्यापक भाऊसाहेब कोटकर यांचा ‘आदर्श मुख्याध्यापक’ पुरस्काराने गौरव

संगमनेर :

शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आणि गुणवत्तेचा सातत्यपूर्ण आलेख राखणारे संगमनेर तालुक्यातील सावरगाव घुले येथील शारदा विद्यालयाचे कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक श्री. भाऊसाहेब कोटकर यांना अहिल्यानगर जिल्हा परिषद माध्यमिक विभाग आणि माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघ, अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.

अहिल्यानगर येथे आयोजित भव्य पुरस्कार वितरण सोहळ्यात आमदार सत्यजित तांबे, आमदार संग्रामभैय्या जगताप, सचिन प्रतापसिंह आणि शिक्षण उपसंचालक डॉ. महेश पालकर आदी मान्यवरांच्या शुभहस्ते तसेच शिक्षण क्षेत्रातील नामवंतांच्या उपस्थितीत श्री. भाऊसाहेब कोटकर यांना हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

मुख्याध्यापक भाऊसाहेब कोटकर यांनी शिक्षण क्षेत्रातील गुणवत्ता वाढीसाठी तसेच विद्यार्थी-केंद्रित शिक्षण प्रणाली राबविण्यासाठी अविरत परिश्रम घेतले आहेत. त्यांच्या कुशल नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली शारदा विद्यालयाने सलग १९ वर्षे इयत्ता दहावीचा १०० टक्के निकाल लावण्याचा ऐतिहासिक विक्रम प्रस्थापित केला आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देत विद्यालयाला एका वेगळ्या उंचीवर नेण्यात त्यांचा महत्त्वपूर्ण वाटा राहिला आहे.

त्यांच्या या शैक्षणिक कार्याची दखल घेत त्यांची जिल्हास्तरीय ‘आदर्श मुख्याध्यापक पुरस्कारासाठी’ निवड करण्यात आली. पुरस्कार मिळाल्याबद्दल मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष सुनील पंडित, जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र सोनवणे, मिथुन डोंगरे यांच्यासह जिल्ह्यातील शैक्षणिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले.

या बहुमानामुळे सावरगाव घुले गावाच्या वैभवात मानाचा तुरा रोवला गेला. या पार्श्वभूमीवर शनिवारी सावरगाव घुले येथे ज्ञानगंगा विद्या प्रसारक शिक्षण संस्थेचे पदाधिकारी, ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांच्या वतीने मुख्याध्यापक भाऊसाहेब कोटकर यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला.

यावेळी ज्ञानगंगा विद्या प्रसारक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय लक्ष्मण घुले, सचिव राघू सावळेराम जाधव, खजिनदार भाऊसाहेब धर्माजी घुले, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष बाबासाहेब कडू, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष जालिंदर घुले, सोसायटीचे चेअरमन संतोष घुले, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र घुले, सोसायटीचे माजी अध्यक्ष श्री. लहानु घुले, बबन गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.

मान्यवरांच्या हस्ते मुख्याध्यापक भाऊसाहेब कोटकर यांना शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. तसेच त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. सत्कार सोहळ्यावेळी शारदा विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आपल्या लाडक्या मुख्याध्यापकांबद्दलचा अभिमान आणि आनंद ओसंडून वाहत होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!