झोळेश्वर विद्यालयाच्या खो-खो संघाचे तालुकास्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

१७ वर्षे वयोगटातील मुली प्रथम; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड — १४ वर्षे वयोगटातील मुलींना द्वितीय क्रमांक

 संगमनेर :

हनुमान शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळ, झोळे संचलित झोळेश्वर आदर्श ग्राम विकास विद्यालय, झोळे-गणेशवाडी या विद्यालयाने क्रीडा क्षेत्रातील यशाची परंपरा कायम राखत तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. विद्यालयाच्या १७ वर्षे वयोगटातील मुलींच्या संघाने खो-खो स्पर्धेत तालुकास्तरावर प्रथम क्रमांक पटकावून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी दिमाखदार प्रवेश मिळविला आहे.

तसेच १४ वर्षे वयोगटातील मुलींच्या संघानेही उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत तालुकास्तरावर द्वितीय क्रमांक मिळविला. दोन्ही संघांच्या या यशामुळे झोळेश्वर विद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

या यशासाठी विद्यार्थिनींना श्री. एरंडे ए. एस., श्री. सार्थक लांडगे सर तसेच विद्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थिनींच्या सातत्यपूर्ण सरावाला आणि मेहनतीला स्पर्धेच्या मैदानावर यशाची पावती मिळाली.

यशस्वी विद्यार्थिनी व मार्गदर्शक शिक्षकांचे संगमनेर तालुका क्रीडा विभागाचे अध्यक्ष श्री. हळनर सर, हनुमान शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष इंजि. नानासाहेब खर्डे व मंडळाचे सर्व सदस्य, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य, शिक्षक पालक संघ, ग्रामपंचायत झोळे, झोळे गावातील विविध संस्था, ग्रामस्थ व पालक यांनी अभिनंदन केले.

चंदनापुरी केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. वाकचौरे साहेब, विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. खेमनर एल. डी. सर, श्री. नवनाथ कोटकर सर, सर्व शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही यशस्वी खेळाडूंचे कौतुक करून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

विद्यालयाच्या या यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण असून, जिल्हास्तरीय स्पर्धेतही झोळेश्वर विद्यालयाचा खो-खो संघ उत्कृष्ट कामगिरी करेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!