शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकतेसाठी विद्यार्थ्यांचे आंदोलन; प्रांताधिकाऱ्यांना निवेदन
संगमनेर,
शिक्षण व्यवस्थेत सुधारणा व्हावी, नीट (NEET) परीक्षेतील पेपरफुटीसारखे प्रकार पुन्हा घडू नयेत तसेच परीक्षा व पेपर तपासणी प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने राबविण्यात यावी, या प्रमुख मागण्यांसाठी संगमनेर येथील विद्यार्थ्यांनी सामाजिक जाणीवेपोटी एकत्र येत सोमवारी बसस्थानकासमोर घोषणाबाजी करत शांततापूर्ण आंदोलन केले. यावेळी रस्त्यावर येणारे जाणाऱ्या विद्यार्थ्यांनीही या आंदोलनाला पाठिंबा दिला.त्यानंतर विद्यार्थ्यांनी प्रांताधिकारी यांना निवेदन सादर केले.
या आंदोलनात मयुरी खरे, प्राची खरे, श्रावणी अरगडे, श्रावणी बिन्नर, आर्यन झुंजीर, ईश्वरी रायन, स्वरा शिसोदे, आश्लेषा मिसाळ, सिद्धी कागडे, सायली चांगले आणि सेजल भळगट यांनी सक्रिय सहभाग घेतला.
विद्यार्थ्यांनी दिलेल्या निवेदनात नीट परीक्षेतील पेपरफुटीसारख्या घटनांमुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ होतो, त्यामुळे अशा प्रकारांना कायमस्वरूपी आळा घालण्यासाठी कठोर उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी केली आहे. तसेच उत्तरपत्रिकांची तपासणी निष्पक्ष, अचूक व पारदर्शक पद्धतीने व्हावी, जेणेकरून प्रत्येक विद्यार्थ्याला न्याय मिळेल, अशीही मागणी करण्यात आली.
याशिवाय पेपरफुटी आणि परीक्षा व्यवस्थेतील त्रुटींमुळे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना शासनाने मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली. तसेच पर्यावरण व शिक्षणासह विविध सामाजिक प्रश्नांवर आंदोलन करणारे सोनम वांगचुक यांनी मांडलेल्या मागण्या शासनाने मान्य करून त्यांचे उपोषण तातडीने सोडवावे, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली.
आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांनी शांततेच्या मार्गाने घोषणाबाजी करत आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यानंतर प्रांताधिकारी कार्यालयात जाऊन निवेदन सादर करण्यात आले. विद्यार्थ्यांनी सांगितले की, कोणत्याही राजकीय हेतूशिवाय केवळ सामाजिक जाणीव आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने हे आंदोलन करण्यात आले असून, शिक्षण व्यवस्थेत आवश्यक सुधारणा करण्यासाठी शासनाने तातडीने सकारात्मक पावले उचलावीत.
