*कासार परिवाराचा ‘वृक्षमय हरित’ गणेशोत्सव; पर्यावरण संवर्धनाचा अनोखा संदेश!*
संगमनेर खुर्द :
दैनिक समर्थ गांवकरी समूहाच्या वतीने आयोजित ‘माझा बाप्पा – आदर्श गणेश सजावट स्पर्धा २०२६’ अंतर्गत धांदरफळ बुद्रुक येथील दत्ता कासार परिवाराच्या ‘स्वप्नपूर्ती मोरया श्री गणेशोत्सवा’चे गणेश सजावट परीक्षण व महाआरती उत्साहात पार पडली.
यावेळी दैनिक समर्थ गांवकरीचे मुख्य संपादक तथा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे, जिल्हा संपर्कप्रमुख भाऊसाहेब वाकचौरे, संगमनेर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय गोपाळे, रामेश्वर देवस्थानचे खजिनदार वसंत वाकचौरे, व्यवस्थापक डॉ. संजय थोरात यांच्यासह राजेंद्र गीते, विनोद वाकचौरे, सचिन काळे, मीना काळे, सचिन कासार, संगीता कासार, सुनीता कासार, भामाबाई कासार, सुनील बिडकर, ओम कासार, साईराज कासार आदी उपस्थित होते.
धांदरफळ बुद्रुक येथील सामाजिक कार्यकर्ते तथा रामेश्वर देवस्थानचे कार्यकारी सचिव आणि स्वदेश उद्योग समूहाचे जनसंपर्क अधिकारी दत्तात्रय कासार यांनी यंदाचा गणेशोत्सव ‘वृक्षमय, हरितमय आणि पर्यावरण संवर्धन’ या संकल्पनेतून साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांचे सुपुत्र मयूर कासार यांनी आकर्षक मयूर देखावा साकारत श्री गणेशाला प्रिय असलेल्या जास्वंद, चाफा, शमी, गुलाब, जरबेरा, केवडा आदी वनस्पतींची लागवड केली आहे.
यामुळे कासार परिवाराचा गणेशोत्सव केवळ सजावटीपुरता मर्यादित न राहता वृक्षसंवर्धन आणि पर्यावरण रक्षणाचा संदेश देणारा ठरला आहे. गणेशोत्सवाच्या माध्यमातून समाजात पर्यावरणाबाबत जनजागृती करण्याचा कासार परिवाराचा उपक्रम उपस्थितांनी कौतुकास्पद असल्याचे सांगितले.
यावेळी डॉ. विश्वासराव आरोटे म्हणाले की, गणेशोत्सव हा भक्ती, आनंद आणि एकतेचा उत्सव आहे. लोकमान्य टिळकांनी समाजात एकोपा निर्माण व्हावा या उद्देशाने सार्वजनिक गणेशोत्सवाला चालना दिली. आज गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत. कासार परिवाराने वृक्षारोपणाला गणेशोत्सवाची जोड देऊन पर्यावरण संवर्धनाचा दिलेला संदेश कौतुकास्पद असून, हा हरित गणेशोत्सव परिसरासाठी ऑक्सिजनची शिदोरी निर्माण करणारा उपक्रम ठरेल, असे त्यांनी सांगितले.
महाआरतीनंतर उपस्थितांनी कासार परिवाराच्या पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे कौतुक केले.
