देशाचं आणि समाजाचं चित्र कुठं बिघडलं आहे हे व्यंगचित्र दाखवतं ः नागराज मंजुळे
अंनिसच्या ‘विवेकरेषा’ या व्यंगचित्र स्पर्धेचे प्रथम पारितोषिक आनंद गायकवाड यांना प्रदान
संगमनेर / लोकवेध live न्यूज
व्यंगचित्र वास्तव अधिक उजागर करून मांडते. स्वतःला कुरूप बघणे कोणालाच आवडत नाही पण तुमच्यात नेमकं काय कमी आहे, हे व्यंगचित्र दाखवतं. देशाचं आणि समाजाचं चित्र कुठं बिघडल आहे हे योग्य आणि बोलक्या रितीने व्यंगचित्रातून मांडलं जातं. त्याला कोणताही फिल्टर नसतो, म्हणून ते प्रभावी ठरतं. व्यक्ती असो वा समाज त्याला व्यंगचित्राची गरज आहे, असं विधान सुप्रसिद्ध दिग्दर्शक व कवी नागराज मंजुळे यांनी केले. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने आयोजित केलेल्या ‘विवेकरेषा’ या व्यंगचित्र प्रदर्शनाच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार मंजुल होते. तर पटकथा लेखक अरविंद जगताप प्रमुख पाहुणे म्हणून तसेच अनिसच्या अॅड. मुक्ता दाभोलकर व हमीद दाभोलकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

साप्ताहिक मार्मिकचे व्यंगचित्रकार म्हणून काम पाहणारे युवा चित्रकार गौरव सर्जेराव यांच्या संकल्पनेतून देशभरातील निवडक २५ व्यंगचित्रकारांच्या कुंचल्यातून साकारलेल्या अंधश्रध्दा, बुवाबाजी, चमत्कारामागील विज्ञान आदी बाबींचा पर्दाफाश करणाऱ्या व्यंगचित्रांचे प्रदर्शन पुण्यातील बालगंधर्व कलादालनात आयोजित करण्यात आले होते. या निमित्ताने १६ वर्षाखालील गट व मोठा गट या दोन गटात राज्यस्तरिय व्यंगचित्र स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमात या स्पर्धेतील दोन्ही गटातील प्रथम तीन क्रमांकाच्या विजेत्यांचा गौरव करुन त्यांना रोख रक्कम, सन्मानपत्र व पुस्तके देऊन गौरवण्यात आले. मोठ्या गटात संगमनेर येथील चित्रकार व पत्रकार आनंद गायकवाड यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
स्पर्धेचे संयोजक गौरव सर्जेराव यांनी मनोगतात त्यांचा सनातनी विचारांपासून ते महाराष्ट्र अंनिस पर्यंतचा प्रवास सांगताना, फुले- शाहू- आंबेडकर ते दाभोलकरांपर्यंतचे विचार हे अंधश्रद्धेविरूद्धची लस असून, ती फक्त आपल्याला सर्वत्र न्यायची आहे असे म्हटले. तर अध्यक्षीय भाषणात ज्येष्ठ राजकिय व्यंगचित्रकार मंजूल म्हणाले की, आम्ही व्यंगचित्राच्या माध्यमातून प्रश्न विचारतो. जो कोणी चमत्काराला नमस्कार करतो, त्या गोष्टीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतो. कोणी नेता आपण अजैविक असल्याचा दावा करतो, त्यावर आम्ही व्यंगचित्रातुन प्रश्न विचारतो. पटकथा लेखक अरविंद जगताप म्हणाले, हुकुमशाही जेवढी जोरात असते तेवढा विनोद खुलत असतो. व्यंगचित्रकारांच्या कलेबरोबर हिंमतीला पण दाद दिली पाहिजे. राजकारणी नेते व व्यंगचित्रकार याचं बोलणं होईल असा काळ पाहिजे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. सूत्रसंचालन रुपाली आर्डे यांनी केले. प्रास्ताविक मुक्ता दाभोलकर यांनी केले. या वेळी अंनिसचे श्रीपाल ललवाणी, अनिल वेल्हाळ, मिलिंद देशमुख, संजय मालती कमलाकर, श्रीराम नलावडे, अरविंद पाखले, दीपक गिरमे, गणेश चिंचोले, सौरभ बागडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
