दुग्धव्यवसायाच्या प्रगतीसाठी रणजितसिंह देशमुख यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन
आष्टी – जिल्हा बीड प्रतिनिधी

आष्टी तालुका दूध उत्पादक संघ मर्यादित, आष्टी जिल्हा बीड यांच्या वतीने आष्टी शहरातील मोरेश्वर मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आलेले “भव्य पशुसंवर्धन व दूध उत्पादन वाढ मार्गदर्शन शिबिर” उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. या शिबिरात दुग्धव्यवसायातील आधुनिक तंत्रज्ञान, पशुसंवर्धन आणि दूध उत्पादन वाढीबाबत शेतकरी बांधवांना रणजितसिंह देशमुख यांनी मोलाचे मार्गदर्शन केले
या कार्यक्रमात राजहंस दूध संघ, संगमनेरचे चेअरमन रणजितसिंह देशमुख यांनी विशेष उपस्थिती लावून शेतकऱ्यांना दुग्धव्यवसायातील बदलते तंत्रज्ञान, उत्तम पशुपालन व्यवस्थापन आणि उत्पादनवाढीसाठी आवश्यक उपाययोजना याविषयी मार्गदर्शन केले. त्यांच्या अनुभवपूर्ण विचारांना शेतकरी व दुग्धव्यवसायिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
यावेळी आमदार सुरेशआण्णा धससाहेब यांच्या गायगोठ्याची पाहणी पंजाब राज्यातील भटिंडा येथील प्रसिद्ध दुग्धव्यवसायिक श्री. संदीप सिंग, डेअरी फार्मर व प्रशिक्षक श्री. हरप्रीत सिंग तसेच रणजितसिंह देशमुख यांनी केली. त्यानंतर आयोजित मेळाव्यात शेतकरी बांधवांना आधुनिक दुग्धव्यवसायाचे महत्त्व पटवून देण्यात आले.
कार्यक्रमास राजहंस दूध संघाचे व्हा. चेअरमन मा. श्री. राजेंद्र चकोर साहेब, संचालक मा. श्री. विक्रमराजे थोरात साहेब, मा. श्री. विलासराव कवडे साहेब, मा. डॉ. प्रमोद पावसे साहेब तसेच आष्टी तालुका दूध उत्पादक संघाचे संचालक, संचालिका, पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने दूध उत्पादक शेतकरी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी आष्टी दूध संघाचे चेअरमन शांतीलाल भोसले यांनी उपस्थित सर्व शेतकरी, पशुपालक व दुग्धव्यवसायिकांचे आभार मानत कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
