महावितरणच्या कामकाजात सुधारणा करा, अन्यथा कठोर कारवाई; आमदार खताळ यांचा इशारा

शेतकरी, उद्योजक व वीजग्राहकांच्या तक्रारींचा आढावा; नवीन उपकेंद्रे, रोहित्र दुरुस्ती व वीजपुरवठा सक्षम करण्यावर भर

संगमनेर

महावितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे शेतकरी, उद्योजक आणि वीजग्राहकांना विनाकारण त्रास सहन करावा लागला आहे. भविष्यात नागरिकांना अशा प्रकारचा त्रास होऊ नये, शेतकरी व ग्राहकहिताची कामे प्राधान्याने करावीत, अशा स्पष्ट सूचना आमदार अमोल खताळ यांनी महावितरण अधिकाऱ्यांना दिल्या. कामकाजात सुधारणा न झाल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

संगमनेर शहर व तालुक्यातील शेतकरी, उद्योजक तसेच सर्वसामान्य वीजग्राहकांना महावितरणच्या कामकाजामुळे निर्माण होणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी आमदार खताळ यांनी महावितरण कार्यालयात आढावा बैठक घेतली. या बैठकीला कार्यकारी अभियंता, सहाय्यक अभियंता व उपअभियंता उपस्थित होते. बैठकीत वीजपुरवठा, नादुरुस्त रोहित्र, वीज उपकेंद्रांची क्षमता, ग्रामीण भागातील वीजवाहिन्यांची दुरवस्था, वीजगळती तसेच मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला.

आमदार खताळ म्हणाले, महावितरणचे पूर्वी दोन उपविभाग होते. आता त्यांची संख्या वाढवून तीन करण्यात आली आहे. त्यामुळे वीजविषयक तक्रारींचे निराकरण अधिक प्रभावीपणे होण्यास मदत होणार आहे. वीजपुरवठा व्यवस्था सक्षम करण्यासाठी नवीन उपकेंद्रांची उभारणी, विद्यमान उपकेंद्रांची क्षमता वाढविणे आणि नादुरुस्त रोहित्रांची दुरुस्ती जलदगतीने करण्यावर भर देण्यात आला. तालुक्यातील वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी मेंढवण येथील १३२ केव्ही क्षमतेचे नवीन उपकेंद्र लवकरात लवकर सुरू करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. तसेच पठारभागातील नांदूर खंदरमाळ येथे नवीन वीज उपकेंद्र उभारण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. या उपकेंद्रांमुळे वीजपुरवठा सुरळीत होण्यास मदत होणार आहे.

तालुक्यातील काही भागांत कमी दाबाने वीजपुरवठा होण्याची समस्या निर्माण झाली होती. त्यावर उपाययोजना करताना ३० अँपिअरची मर्यादा वाढवून ५० अँपिअर करण्यात आली असून, त्यामुळे तालुक्यातील २०८ ठिकाणी पूर्ण दाबाने वीजपुरवठा होत आहे. महावितरणच्या विविध अडचणी सोडविण्यासाठी ऊर्जा राज्यमंत्र्यांची भेट घेऊनही पाठपुरावा करण्यात आला आहे. तालुक्यात मध्यंतरी वीज रोहित्र जळण्याचे प्रमाण वाढल्याने शेतकरी व वीजग्राहकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. जळालेले रोहित्र दुरुस्त करून पुन्हा उपलब्ध होण्यासाठी तीन ते चार दिवस लागत होते. हा कालावधी कमी करून दोन दिवसांत रोहित्र उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

नादुरुस्त रोहित्र दुरुस्तीसाठी बाभळेश्वर येथे पाठवावे लागत असल्याने विलंब होत होता. त्यामुळे संगमनेर व अकोले या दोन्ही तालुक्यांसाठी संगमनेर येथेच रोहित्र दुरुस्ती केंद्र सुरू करण्यात येणार आहे. आपल्या दीड ते दोन वर्षांच्या कार्यकाळात जवळपास ४५० ते ५०० नवीन रोहित्र उपलब्ध करून देण्यात आले असून, पुढील काळातही आवश्यकतेनुसार रोहित्र उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा केला जाईल. संगमनेर शहरातील वाढत्या वीज मागणीमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी नगरपालिकेकडे जागेची मागणी करण्यात आली होती. मात्र, दुर्दैवाने ही जागा उपलब्ध होऊ शकली नाही. तरीही कोणतेही राजकारण न करता पद्मानगर येथील वीज उपकेंद्राची क्षमता येत्या एक ते दीड महिन्यात वाढविण्यात येणार आहे. तसेच महावितरण कार्यालयाच्या परिसरातील उपलब्ध जागेत पर्यायी उपकेंद्र सुरू करण्याचाही विचार सुरू आहे. या उपाययोजनांमुळे शहरातील वीजपुरवठ्यावरील ताण कमी होऊन ग्राहकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

ग्रामीण भागात महावितरणचे काही ठेकेदार मनमानी पद्धतीने काम करत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. तसेच काही ठिकाणी लाइनमनने राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याप्रमाणे वागण्याऐवजी निष्पक्षपणे काम करणे आवश्यक आहे. शेतकरी व वीजग्राहकांच्या अडचणी लक्षात घेऊन कामकाजात सुधारणा करावी. कामात हलगर्जीपणा किंवा मनमानी आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करावी, असा इशारा देण्यात आला.
संगमनेर, साकूर, धांदरफळ, निमोण व तळेगाव या भागांतील वीजगळती कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. साकूर, कोकणगाव, कर्जुले पठार, रहिमपूर, धांदरफळ, आश्वी व हिवरगाव या भागांतील वीज उपकेंद्रांची क्षमता वाढविण्यात आली आहे. महावितरणच्या थकबाकीदार ग्राहकांना दिलासा मिळावा आणि थकबाकीतून मुक्त होण्याची संधी मिळावी, यासाठी अभय योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन आमदार अमोल खताळ यांनी केले.

तालुक्याच्या ग्रामीण भागात अनेक ठिकाणी वीजवाहक तारा खाली लोंबकळत आहेत. काही रोहित्रांमधून तेलगळती होत असून, अनेक वर्षांपासूनचे वीजखांब नादुरुस्त अवस्थेत आहेत. अशा धोकादायक बाबींकडे दुर्लक्ष न करता संबंधित वीजवाहिन्या, खांब आणि रोहित्रांची तातडीने दुरुस्ती करावी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना महावितरणच्या कामकाजाचा त्रास होऊ नये, याची जबाबदारी कार्यकारी अभियंता, सहाय्यक अभियंता, उपअभियंता व कनिष्ठ अभियंता यांनी घ्यावी.

– अमोल खताळ( आमदार)
………………………………………………………..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!