चाळीस वर्षांचा प्रश्न चार दिवसांत मार्गी! सोमवारी लोकार्पण
धांदरफळ खुर्द येथील बिरोबा मंदिर परिसराचे रस्ते काँक्रीटीकरण व स्ट्रीट लाईटचे काम पूर्ण
संगमनेर/ प्रतिनिधी
संगमनेर तालुक्यातील धांदरफळ खुर्द येथील बिरोबा महाराज मंदिर परिसराच्या विकासाला आमदार अमोल खताळ यांच्या माध्यमातून गती मिळाली आहे. प्रादेशिक विकास पर्यटन योजनेंतर्गत मंदिर परिसरातील रस्त्याचे काँक्रीटीकरण आणि स्ट्रीट लाईट बसविण्याचे काम अवघ्या चार दिवसांत पूर्ण करण्यात आले. गेल्या चाळीस वर्षांपासून प्रलंबित असलेली ही कामे यात्रेपूर्वी पूर्ण झाल्याने बिरोबा महाराजांच्या भक्तांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. या विकासकामांचे लोकार्पण सोमवार (ता.२३) यात्रेच्या दिवशी आमदार खताळ यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
तालुक्याच्या पश्चिम भागातील बिरोबा महाराज मंदिर हे परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. यात्रेच्या काळात येथे दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक येत असतात. मात्र, मंदिराकडे जाणारा रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून उखडलेला होता. तसेच मंदिर परिसरात रात्रीच्या वेळी प्रकाशाची व्यवस्था नसल्याने भाविकांना ये-जा करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. विशेषतः यात्रेच्या काळात या समस्येमुळे भाविकांची गैरसोय होत होती. धांदरफळ खुर्द आणि परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या बिरोबा महाराज मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याचे काँक्रीटीकरण करावे, तसेच मंदिर परिसरात प्रकाशाची व्यवस्था करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी आमदार खताळ यांच्याकडे केली होती. ग्रामस्थांच्या या मागणीची दखल घेत आमदार खताळ यांनी मंदिर परिसराच्या सुशोभीकरण व विकासकामांना प्राधान्य दिले.
प्रादेशिक विकास पर्यटन योजनेंतर्गत मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात आले असून, रात्रीच्या वेळी भाविकांना सुरक्षितपणे ये-जा करता यावी, यासाठी परिसरात स्ट्रीट लाईट बसविण्यात आली आहे. विशेष म्हणजे, ही दोन्ही कामे अवघ्या चार दिवसांत पूर्ण करण्यात आली. कामांचा वेग राखतानाच गुणवत्तेलाही प्राधान्य देण्यात आल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. बिरोबा महाराजांच्या यात्रेपूर्वीच रस्त्याचे काम पूर्ण झाल्याने भाविकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मंदिर परिसरातील विकासकामांमुळे यात्रेच्या काळात येणाऱ्या भाविकांची गैरसोय दूर होणार असून, मंदिर परिसर अधिक सुस्थितीत आणि प्रकाशमान होणार आहे. या कामांबद्दल मंदिर देवस्थान ट्रस्ट आणि धांदरफळ खुर्द ग्रामस्थांनी आमदार अमोल खताळ यांचे आभार मानले आहेत.
