*गरिबीचा आकडा घटला, पण गरिबीचे वास्तव संपले का?*
भारताच्या आर्थिक विकासाची चर्चा करताना आज गरिबी कमी झाल्याची आकडेवारी ठळकपणे पुढे येत आहे. देशातील कोट्यवधी नागरिक गरिबीच्या रेषेबाहेर आले, अत्यंत गरिबीचे प्रमाण घटले आणि जागतिक अर्थव्यवस्थेत भारताचे स्थान अधिक मजबूत झाले, ही निश्चितच समाधानाची बाब आहे. दुसरीकडे, देशातील सुमारे ८० कोटी नागरिकांना मोफत अन्नधान्य पुरविण्याची व्यवस्था आजही सुरू आहे. त्यामुळे एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो. जर देशातील गरिबी मोठ्या प्रमाणात कमी झाली असेल, तर एवढ्या मोठ्या लोकसंख्येला अन्नसुरक्षेसाठी सरकारी मदतीची गरज का भासते? गरिबी कमी झाल्याचा अर्थ नागरिक आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झाले आहेत का? की गरिबीचे स्वरूप बदलले असून तिचे मूळ प्रश्न अजूनही कायम आहेत?
*आकडेवारीतील प्रगती आणि वास्तवातील प्रश्न*
जागतिक बँकेच्या एप्रिल २०२६ मधील भारताच्या विकासविषयक अहवालानुसार, २०११-१२ मध्ये २७.१ टक्के असलेले अत्यंत गरिबीचे प्रमाण २०२३-२४ मध्ये २.६ टक्क्यांवर आले. त्याचप्रमाणे निम्न-मध्यम उत्पन्न गटासाठी निर्धारित आंतरराष्ट्रीय गरिबी निकषाखालील लोकसंख्येचे प्रमाण ५७.७ टक्क्यांवरून १६.१ टक्क्यांपर्यंत घटले. या आकडेवारीतून भारताने गरिबी कमी करण्याच्या दिशेने केलेली प्रगती स्पष्ट होते. मात्र, गरिबीचे प्रमाण कमी होणे आणि नागरिकांची आर्थिक स्थिती मजबूत होणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. एखादे कुटुंब गरिबीच्या निर्धारित निकषाच्या वर गेले, तरी त्याच्याकडे नियमित उत्पन्न, पुरेशी बचत, आरोग्यविषयक सुरक्षितता किंवा रोजगाराची हमी असेलच असे नाही.
गरिबीचे मोजमाप करताना ठरावीक उत्पन्न किंवा उपभोग खर्चाचा निकष वापरला जातो. परंतु प्रत्यक्ष जीवनात माणसाची आर्थिक परिस्थिती अनेक घटकांवर अवलंबून असते. घरातील कमावत्या व्यक्तीचा रोजगार बंद पडला, अचानक आजारपण आले, मुलांच्या शिक्षणाचा खर्च वाढला किंवा शेतीचे नुकसान झाले, तर काही दिवसांतच आर्थिक गणित कोलमडू शकते. त्यामुळे गरिबीच्या आकडेवारीतून बाहेर पडलेल्या प्रत्येक कुटुंबाला आर्थिकदृष्ट्या सुरक्षित मानणे योग्य ठरणार नाही.
*८० कोटींची अन्नसुरक्षा : दिलासा की आत्मपरीक्षणाची संधी?*
देशातील सुमारे ८०.४८ कोटी लाभार्थ्यांना राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायद्यांतर्गत मोफत धान्याचा लाभ दिला जात असल्याची माहिती केंद्र सरकारच्या अन्न व सार्वजनिक वितरण विभागाच्या आकडेवारीत आहे. २०२४ पासून पुढील पाच वर्षांसाठी ही व्यवस्था कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना अन्नधान्याची उपलब्धता सुनिश्चित करणे, त्यांच्या खर्चाचा भार कमी करणे आणि उपासमारीपासून संरक्षण देणे या दृष्टीने ही योजना महत्त्वाची आहे. मात्र, या योजनेकडे केवळ कल्याणकारी मदत म्हणून न पाहता देशाच्या आर्थिक परिस्थितीचा एक महत्त्वाचा निर्देशक म्हणूनही पाहण्याची गरज आहे. मोफत धान्य मिळणे ही गरजू कुटुंबांसाठी मोठी मदत आहे; परंतु त्या कुटुंबाला स्वतःच्या उत्पन्नातून अन्नधान्य खरेदी करता येईल, इतकी आर्थिक क्षमता निर्माण झाली का, हा प्रश्न अधिक महत्त्वाचा आहे. अन्नसुरक्षा ही प्रत्येक नागरिकाची मूलभूत गरज आहे. परंतु अन्नधान्याच्या मदतीबरोबरच रोजगार, उत्पन्न आणि आर्थिक स्वावलंबनाची संधी निर्माण झाली पाहिजे. सरकारी मदत ही संकटाच्या काळात आधार ठरावी; मात्र कायमस्वरूपी जगण्याचा एकमेव आधार बनू नये, ही विकासाच्या धोरणासमोरील महत्त्वाची अपेक्षा आहे.
*रोजगार आहे; पण आर्थिक स्थैर्य किती?*
गरिबी कमी करण्यासाठी रोजगारनिर्मिती हा सर्वांत महत्त्वाचा घटक आहे. मात्र, रोजगाराच्या संख्येबरोबर त्याची गुणवत्ता तपासणेही आवश्यक आहे. एखाद्या व्यक्तीला काम मिळाले म्हणजे तिचे आर्थिक प्रश्न संपले, असे म्हणता येत नाही. नियमित वेतन, कामाची सुरक्षितता, सामाजिक सुरक्षा, भविष्य निर्वाह निधी, आरोग्यविमा आणि उत्पन्नातील सातत्य या बाबीही तितक्याच महत्त्वाच्या आहेत.
आज मोठ्या प्रमाणावर नागरिक असंघटित क्षेत्रात काम करतात. बांधकाम मजूर, शेतमजूर, फेरीवाले, घरकाम करणारे कामगार, लहान व्यावसायिक आणि रोजंदारीवर अवलंबून असलेल्या व्यक्तींचे उत्पन्न निश्चित नसते. काम मिळाले तरच घरात चूल पेटते, अशी अनेक कुटुंबांची परिस्थिती आहे. केंद्र सरकारच्या २०२५ च्या आवधिक श्रमबल सर्वेक्षणात नियमित वेतनधारक रोजगाराचा वाटा वाढल्याचे दिसत असले, तरी स्वयंरोजगार आणि अनौपचारिक कामाचे महत्त्वही मोठे आहे. त्यामुळे रोजगारवाढीचे मूल्यमापन करताना केवळ काम करणाऱ्यांची संख्या न पाहता त्यांच्या उत्पन्नाची गुणवत्ता आणि आर्थिक सुरक्षितता तपासणे आवश्यक आहे.
शिक्षण पूर्ण करून बाहेर पडणाऱ्या तरुणांसमोरही रोजगाराचे मोठे आव्हान आहे. पदवी असूनही अपेक्षित नोकरी मिळत नाही, तर अनेकांना कमी उत्पन्नाच्या कामावर समाधान मानावे लागते. कौशल्य आणि उपलब्ध रोजगार यांच्यातील अंतर कमी करणे, लघुउद्योगांना चालना देणे आणि स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी वाढविणे ही काळाची गरज आहे.
*शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचा प्रश्न अजूनही अनुत्तरित*
देशातील गरिबीच्या चर्चेत शेतकरी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा विचार केल्याशिवाय चित्र पूर्ण होऊ शकत नाही. शेती हा आजही मोठ्या लोकसंख्येच्या उपजीविकेचा आधार आहे. मात्र, उत्पादन खर्चात वाढ, बाजारभावातील चढ-उतार, नैसर्गिक आपत्ती, अनियमित पाऊस आणि कर्जाचा वाढता भार यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित अनेकदा कोलमडते. विशेषतः मराठवाड्यासारख्या दुष्काळप्रवण भागातील शेतकऱ्यांसाठी हा प्रश्न अधिक गंभीर आहे. पावसाच्या अनिश्चिततेमुळे शेतीचे उत्पादन घटते, पाणीटंचाईमुळे पिके धोक्यात येतात आणि रोजगारासाठी ग्रामीण कुटुंबांना स्थलांतर करावे लागते. अशा परिस्थितीत गरिबी कमी झाल्याच्या राष्ट्रीय आकडेवारीचा स्थानिक पातळीवरील परिणाम तपासणे आवश्यक ठरते.
शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी केवळ अनुदाने किंवा कर्जमाफी पुरेशी ठरणार नाही. सिंचन सुविधा, जलसंधारण, शेतमालाला योग्य भाव, साठवणूक व्यवस्था, प्रक्रिया उद्योग, बाजारपेठेपर्यंत पोहोच आणि पूरक व्यवसायांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. ग्रामीण भागात कृषीपूरक उद्योग उभे राहिले, तर शेतीवरील अवलंबित्व कमी होऊन स्थानिक रोजगारनिर्मितीला चालना मिळू शकते.
*कल्याणकारी योजनांबरोबर स्वावलंबनाचा मार्ग*
सरकारी योजनांची आवश्यकता नाकारता येणार नाही. गरिबांना अन्नधान्य, आरोग्यसेवा, निवारा, शिक्षण आणि आर्थिक मदत मिळणे हे कल्याणकारी शासनाचे कर्तव्य आहे. मात्र, या योजनांचा उद्देश केवळ तात्पुरता दिलासा देणे नसून लाभार्थ्यांना स्वावलंबी बनविण्याच्या दिशेनेही असला पाहिजे.
मोफत धान्याबरोबर रोजगाराच्या संधी, कौशल्य प्रशिक्षणाबरोबर उद्योग उभारणीसाठी मदत, घरकुलाबरोबर उत्पन्नाचे साधन आणि आरोग्यविम्याबरोबर दर्जेदार सार्वजनिक आरोग्यसेवा या बाबींची सांगड घालणे आवश्यक आहे. योजनांचा लाभ घेणाऱ्या कुटुंबातील पुढील पिढीला शिक्षण आणि रोजगाराच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम होता आले, तरच गरिबीचे दुष्टचक्र खऱ्या अर्थाने मोडता येईल.
*गरिबीमुक्त भारताचा अर्थ नव्याने समजून घ्यावा लागेल*
देशाच्या विकासाचे मूल्यमापन करताना किती लोकांना मोफत धान्य मिळाले, किती जण गरिबीच्या निकषाबाहेर आले किंवा किती योजना राबविल्या गेल्या, एवढेच प्रश्न पुरेसे नाहीत. किती कुटुंबांना नियमित रोजगार मिळाला, किती शेतकऱ्यांचे उत्पन्न स्थिर झाले, किती तरुण आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झाले आणि किती कुटुंबे सरकारी मदतीशिवाय आपल्या मूलभूत गरजा भागवू शकतात, हेही तपासावे लागेल.
गरिबी कमी झाल्याची आकडेवारी ही निश्चितच देशासाठी आशादायी बाब आहे. मात्र, त्या आकडेवारीमागील सामाजिक आणि आर्थिक वास्तव समजून घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. मोफत धान्याची गरज असलेली कुटुंबे, अस्थिर रोजगारावर जगणारे कामगार आणि नैसर्गिक संकटांशी झुंजणारे शेतकरी यांचे प्रश्न सुटल्याशिवाय गरिबी निर्मूलनाचा प्रवास पूर्ण होणार नाही.
भारताला विकसित राष्ट्र बनवायचे असेल, तर नागरिकांना केवळ मदतीवर जगण्याची वेळ येऊ नये, तर स्वतःच्या कष्टातून सन्मानाने जगता यावे, अशी अर्थव्यवस्था निर्माण करावी लागेल. कारण गरिबाला धान्य देणे ही सामाजिक जबाबदारी आहे; पण त्याला स्वतःच्या उत्पन्नातून धान्य खरेदी करता येईल, अशी क्षमता निर्माण करणे हे खऱ्या विकासाचे उद्दिष्ट असले पाहिजे. गरिबीचा आकडा घटणे ही प्रगतीची सुरुवात असू शकते; मात्र आर्थिक स्वावलंबन, रोजगाराची सुरक्षितता आणि सन्मानाचे जीवन हेच गरिबीमुक्त भारताचे खरे मापदंड ठरले पाहिजेत.
*-सुरेश मंत्री, अंबाजोगाई*
*संपर्क – ९४०३६५०७२२*
