कनोलीत श्री बालाजी दूध संस्थेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते उद्घाटन

संगमनेर / लोकवेध live न्यूज

कनोली येथील अग्रगण्य श्री बालाजी सहकारी दूध संस्थेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. या प्रसंगी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, राजहंस दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख, एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्षा जयश्रीताई थोरात आदी मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमात संस्थेचे चेअरमन इंद्रभान चौधरी व व्हाईस चेअरमन राजेंद्र वर्पे यांनी आलेल्या पाहुण्यांचा सन्मान सत्कार करून स्वागत केले.

श्री बालाजी सहकारी दूध संस्था ही तालुक्यातील एक आदर्श संस्था म्हणून ओळखली जाते. संस्थेच्या दुध संकलन केंद्रात मोठ्या प्रमाणावर वीज वापरली जाते. वाढत्या वीज दराचा ताण कमी करण्यासाठी तसेच पर्यावरणपूरक ऊर्जेचा वापर करण्यासाठी संस्थेने तब्बल ५० किलोवॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारला आहे. या प्रकल्पामुळे संस्थेला दरमहा लाखो रुपयांची वीज बचत होणार असून, कार्बन उत्सर्जनात घट होऊन पर्यावरण संवर्धनालाही हातभार लागणार आहे. ग्रामीण भागात अशा स्वरूपाचा प्रकल्प उभारून संस्थेने इतर संस्थांसाठी आदर्श निर्माण केला आहे.

उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन करताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, “श्री बालाजी दूध संस्थेने आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारून शाश्वत विकासाचा मार्ग अवलंबला आहे. सौरऊर्जेमुळे खर्च बचत होईलच, पण भविष्यातील पिढ्यांसाठी स्वच्छ व पर्यावरणपूरक ऊर्जा उपलब्ध होईल. अशा संस्थांनी पुढाकार घेतल्यास ग्रामीण भागात विकासाची नवी दिशा निर्माण होईल.”

यावेळी थोरात यांनी संस्थेच्या कारभाराविषयी माहिती घेऊन समाधान व्यक्त केले तसेच संचालक मंडळाच्या कामगिरीचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमास संचालक मंडळाचे सर्व सदस्य, ग्रामस्थ व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रकल्पाच्या उद्घाटनाचे साक्षीदार झाले. या उपक्रमामुळे कनोली परिसरात शाश्वत व पर्यावरणपूरक विकासाचा नवा अध्याय सुरू झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!