भंडारदरा ,
सांदन दरीत अडकलेल्या पर्यटकांची सुखरूप सुटका
भंडारदरा / लोकवेध live न्यूज 
अकोल्यातील शेंडी भंडारदरा येथे रविवारी दुपारी आलेल्या वळवाच्या पावसाने धुमाकूळ घातला. वादळी वाऱ्या सह झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. अकोले येथे वीज पडून शेतकरयाचा मृत्यू झाला, तर पाथर्डी येथे टोलनाक्याचे शेड पडले. दरम्यान, अचानक आलेल्या पावसामुळे सांदण दरीत अनेक पर्यटक अडकले होते. त्यांना वन विभागाच्या कर्मचारयांनी सुखरूप बाहेर काढले.
मान्सूनपूर्व पावसाने नगर शहरासह जिल्ह्याला चांगलेच झोडपले. नगर तालुक्यासह पाथर्डी, शेवगाव, अकोले, नेवासा, संगमनेर, शिर्डी येथे पावसाने धुमाकूळ घातला. नगर शहरात काही ठिकाणी झाडे पडल्याने मोठे नुकसान झाले. यासोबत मोठय़ा प्रमाणावर पाणी रस्त्यावर साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. अकोले येथे वादळी वाऱयासह विजांच्या कडकडाटात प्रचंड पाऊस झाला.  संगमनेर तालुक्यात  दुपारी दोनच्या सुमारास आलेल्या वादळी वाऱ्या मुळे प्रमाणावर नागरिकांची दाणादाण उडाली.
शनिवार, रविवार सुट्टी व भंडारदरा धरण परिसरात सुरू असलेल्या ‘काजवा महोत्सवासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे. रविवारी दुपारी अनेक पर्यटक सांदण व्हॅलीमध्ये (दरी) उतरले होते. परंतु दुपारी अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे पाण्याचा ओघ वाढू लागला. त्यामुळे अनेक पर्यटक कॅलीमध्ये अडकले. पर्यटक घाबरले आणि आरडाओरड करू लागले. या दरम्यान गस्तीवर असलेल्या वन विभागाच्या वनसंरक्षक महिंद्रा पाटील, दिवे यांनी स्थानिक नागरिक व गाईड यांच्या मदतीने अडकलेल्या पर्यटकांना सुखरूप बाहेर काढले. दरम्यान, भंडारदरा परिसरात असलेली सांदण दरी ही आशिया खंडातील दुसऱया क्रमांकाची खोल व्हॅली म्हणून ओळखली जाते. येथे पर्यटकांची नेहमीच गर्दी असते. पाण्याचा अंदाज नसल्यास पर्यटकांनी दरीमध्ये जाऊ नये, असे आवाहन वनविभागाने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!