मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने प.पू. गगनगिरी महाराज विद्यालयाला 5000 रुपयांचे पारितोषिक जाहीर.
पिंपरणे / लोकवेध live न्यूज
मुख्य निवडणूक अधिकारी,महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने गणेशोत्सव सजावट स्पर्धेसाठी मतदार जागृकता व निवडणूक प्रक्रिया या विषयांतर्गत सादर केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव देखावा स्पर्धेमध्ये संगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथील परमपूज्य गगनगिरी महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या देखाव्यास उत्तेजनार्थ 5000 ₹ पारितोषिक जाहीर झाले आहे.
मतदार जागृकता व निवडणूक प्रक्रिया अंतर्गत विद्यालयातील शिक्षक, विद्यार्थी व ग्रामस्थ यांच्या वतीने विविध प्रसंग सादर करण्यात आले होते. यात मतदानाच्या दिवशी मतदारांनी सुट्टीचा दिवस म्हणून पर्यटन, घरची कामे ,आराम याला प्राधान्य न देता मतदानाचे पवित्र व प्रथम कर्तव्य पार पाडावे. तसेच कुठल्याही प्रलोभनांना बळी न पडता मतदान करावे. मतदान कक्षातील दिव्यांग,वृद्धांसाठी असणाऱ्या सुविधा या दाखवण्यात आल्या होत्या. मतदानामध्ये शहरी, ग्रामीण,श्रीमंत,गरीब, महिला, पुरुष असा कुठलाही भेदभाव असत नाही. हेही स्पष्ट करण्यात आले होते.
आपले आधार कार्ड मतदान कार्डला जोडणे कसे आवश्यक आहे त्याचाही संदेश या देखाव्यातून दिला होता. आपल्या एका मताची किंमत किती मोठी आहे, यातूनच ग्रामपंचायत सदस्या पासूनआमदार, खासदार, मुख्यमंत्री,पंतप्रधान व राष्ट्रपती पर्यंत प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष निवड होते याची जाणीवही या देखाव्यात करून दिली आहे. जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या आपल्या भारतातील ही निवडणूक प्रक्रिया सामान्य मतदारांना समजून सांगणे, मतदानाचे महत्त्व पटवून देणे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा देखावा तयार करण्यात आला. या देखावाच्या सादरीकरणात श्रीमती कविता ढोमसे, श्री तथागत रोकडे, श्री दिलीप डोंगरे, श्री किशोर बांगर, श्री भाऊसाहेब पानसरे, श्री भीमा धिंदळे, श्री ललित शेळके या शिक्षकांनी महत्त्वपूर्ण भूमिका केल्या आहेत. तसेच निकिता गुंजाळ, ऋतुजा दरेकर, ऋतिका गाडेकर, कामिनी साळवे, कीर्ती गाडेकर, रेणुका साळवे ,आरती आव्हाड, कुमार रितेश साळवे,वैभव साळवे , संकेत भादेकर, सिद्धार्थ साळवे, विशाल अवचिते, गणेश राहिंज, करण केदारे, प्रतीक कुदळ, विकी खेमनर, धनंजय देशमुख या जूनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी व सौ.लहानबाई खरात, सौ.बबूबाई साळवे, श्री.बागुल बाबा या ग्रामस्थांनी भूमिका केल्याआहेत. दत्तात्रय ठोसर, गणेश दातीर, अमोल शेपाळ, चैतन्य भडकवाड यांनी विशेष सहकार्य केले आहे.
श्री सुभाष भालेराव यांनी चित्रीकरणाची महत्त्वाची जबाबदारी पार पाडली. या देखाव्याची संहिता लेखन, दिग्दर्शन व निवेदन प्राचार्य मुकुंद डांगे यांनी केले. विद्यालयाला मिळालेल्या या पारितोषिका बद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. बापूसाहेब देशमुख, पदाधिकारी, संचालक ,स्कूल कमिटी सदस्य,ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले आहे.
