मुल आणि पालक यांच्यातील सुसंवाद गरजेचा – मिताली लाठी
अंबाजोगाई / लोकवेध live न्यूज / सुरेश मंत्री
:मुल आणि पालक यांच्यामध्ये केवळ संवाद गरजेचा नसुन सुसंवाद गरजेचा आहे. सोशल मीडियाच्या या काळात पालक आणि मुलांनी मोबाइलचा वापर आवश्यकतेपुरताच करावा. मोबाइल अडिक्शनचे परिणाम व्यसनाधीनतेपेक्षाही घातक असल्याने सोशल मीडियाच्या अधीन आजची मुले जावून त्यांचे शैक्षणिक नुकसान तर होत आहेच सोबत त्यांचा पालकांसोबतचा सुसंवाद खुंटत चालला आहे असे प्रतिपादन मिताली लाठी यांनी अंबाजोगाई येथील माहेश्वरी समाजाच्या वतीने आयोजित मिले सुर मेरा तुम्हारा या कार्यक्रमात केले.
याबाबत सविस्तर असे की, महेश नवमी निमित्त अंबाजोगाई तालुका माहेश्वरी समाजाच्या वतीने मिले सुर मेरा तुम्हारा हा कार्यक्रम येथील विलासराव देशमुख सभागृहात दि. १३ जुन रोजी आयोजित करण्यात आला होता. यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना मिताली लाठी म्हणाल्या की, आजकाल सोशल मीडियाचा बोलबाला असल्याने प्रत्येक जण सोशल मीडियावर व्यस्त आहे. यामुळे मुल आणि पालक यांच्यातील संवाद खुंटत चालल्याने अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. अनेकजण स्क्रीन अडिक्शनचे बळी पडत आहेत. यामुळे मुलांसोबत पालकांनी सुद्धा मोबाइलचा वापर कमी करुन आपल्या मुलांसोबत सुसंवाद साधावा. आपल्या वैयक्तिक आयुष्यातील गोष्टी सोशल मीडियावर सार्वजनिक करु नयेत. आठवड्यातून एक दिवस मोबाइल पूर्णपणे वर्ज्य करावा. कुटुंबातील सुसंवाद हाच अनेक कौटुंबिक समस्यांवरील उपाय आहे.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक माहेश्वरी समाजाचे जिल्हा सचिव जगदीश जाजू यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन दिपा धुत यांनी तर आभार प्रदर्शन नेतल थुत यांनी केले. यावेळी माहेश्वरी समाजाचे जिल्हाध्यक्ष अॅड. श्रीकृष्ण तोष्णीवाल, जिल्हा सचिव सतीश तोष्णीवाल, जिल्हा महिला अध्यक्ष पुनम जाजु, तालुकाध्यक्ष दत्तप्रसाद लोहिया, तालुका महिला अध्यक्ष शिवकन्या रांदड व माहेश्वरी समाजातील शालेय मुले व पालक मोठय़ा संख्येने हजर होते.
