पत्रकारांचा सन्मान आणि त्यांच्या पाल्यांच्या शिक्षणाला हातभार; व्हॉईस ऑफ मीडिया व जयहिंद लोकचळवळीचा स्तुत्य उपक्रम

अहिल्यानगर (प्रतिनिधी)
लोकशाही व्यवस्था भक्कम राहण्यासाठी पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असतो. समाजातील अन्याय, भ्रष्टाचार आणि जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडून त्यावर प्रभावीपणे प्रकाश टाकण्याचे काम पत्रकार सातत्याने करत असतात. त्यामुळे पत्रकारांनी स्वतःच्या कुटुंबासह समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्र येऊन कार्य करणे काळाची गरज आहे. जयहिंद लोकचळवळही निरोगी, सुदृढ, समताधिष्ठित आणि एकसंघ समाज निर्माण करण्यासाठी सातत्याने विविध उपक्रम राबवत आहे. समाजात कोणताही भेदभाव न ठेवता परस्पर सहकार्याची भावना जोपासली पाहिजे. विषमता दूर होऊन प्रत्येक नागरिकाला अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य या मूलभूत गरजा उपलब्ध झाल्या तरच राष्ट्र खऱ्या अर्थाने प्रगत होईल. सुदृढ नागरिक हाच प्रगत राष्ट्राचा खरा पाया आहे, असे प्रतिपादन नाशिक पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले.
व्हॉईस ऑफ मीडिया आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना आणि जयहिंद लोकचळवळ यांच्या संयुक्त विद्यमाने अहिल्यानगर येथे पत्रकारांच्या पाल्यांना शैक्षणिक किट वाटपाचा प्रेरणादायी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पत्रकारांच्या मुलांच्या शैक्षणिक प्रवासाला बळ देण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात आले. शिक्षण हीच भविष्यातील सर्वात मोठी गुंतवणूक असून पत्रकारांच्या पाल्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे ही समाजाची सामूहिक जबाबदारी असल्याचेही यावेळी मान्यवरांनी नमूद केले.
यावेळी जामखेड तालुक्यातील अविनाश बोधले, श्रीगोंद्याच्या गायत्री ढवळे, शेवगावचे अल्ताफ शेख, संगमनेरचे भारत रेघाटे, पाथर्डीचे महादेव दळे, श्रीगोंद्याचे मुश्ताक शेख तसेच नेवासाचे रमेश पाडोळे यांनी मनोगत व्यक्त करत व्हॉईस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेच्या सामाजिक, शैक्षणिक व संघटनात्मक उपक्रमांचे कौतुक केले. पत्रकारांच्या हितासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांमुळे संघटना अधिक सक्षम होत असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व्हॉईस ऑफ मीडिया आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटनेचे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब गडाख यांनी केले. संघटनेचे संचालक गोरक्षनाथ मदने यांनी आपल्या मनोगतात पत्रकारांनी संघटित राहून समाजहिताच्या कार्यात अधिक सक्रिय भूमिका बजावावी, असे आवाहन केले. राज्य विंग प्रमुख अमोल मतकर यांनी संघटनेचा उद्देश, आतापर्यंतचे कार्य आणि भविष्यातील दिशा यांचा सविस्तर आढावा घेतला. संघटनेच्या पंचसूत्री कार्यक्रमांतर्गत आरोग्य, शिक्षण, कौशल्य विकास, शासकीय योजनांचा लाभ आणि संघटनात्मक बळकटीकरण या विषयांवर विशेष भर दिला जात असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच विविध क्षेत्रांसाठी स्वतंत्र विंगची स्थापना करून संघटनेचे कार्य अधिक प्रभावी करण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी जिल्ह्यातील सर्व तालुकाध्यक्षांनी आपल्या-आपल्या तालुक्यातील संघटनात्मक कामकाजाचा आढावा सादर केला. पत्रकारांना भेडसावणाऱ्या विविध समस्या, अडचणी आणि अपेक्षा यांवर मुक्तपणे चर्चा झाली. जिल्हाध्यक्ष बाळासाहेब गडाख यांनी सर्व पदाधिकाऱ्यांच्या समस्या समजून घेत त्यावर सकारात्मक भूमिका मांडत संघटना पत्रकारांच्या पाठीशी ठामपणे उभी राहील, अशी ग्वाही दिली.
आभार प्रदर्शन करताना जिल्हा सचिव नवनाथ वावरे यांनी आमदार सत्यजित तांबे आणि माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या माध्यमातून अहिल्यानगर, नाशिक, धुळे आणि नंदुरबार या चार जिल्ह्यांतील पत्रकारांच्या पाल्यांना शैक्षणिक किट उपलब्ध करून देण्यात आल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. पत्रकारांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि संघटनात्मक उपक्रमांना त्यांच्या माध्यमातून सातत्याने सहकार्य लाभत असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन व्हॉईस ऑफ मीडिया आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटनेचे संचालक गोरक्षनाथ मदने यांनी केले.
या प्रसंगी जिल्हाभरातील व्हॉईस ऑफ मीडिया आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटनेचे पदाधिकारी, तालुकाध्यक्ष, सदस्य आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
