कै. पंढरीनाथ विश्राम बागुल यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन; राजहंस दूध संघाची चेअरमन रणजितसिंह देशमुख यांची भावपूर्ण भेट
संगमनेर प्रतिनिधी :
पिंपरणे येथील प्रगतशील शेतकरी तथा समाजाभिमुख व्यक्तिमत्त्व कैलासवासी पंढरीनाथ विश्राम बागुल यांचे रविवार, दि. 19 जुलै रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून विविध क्षेत्रातील मान्यवर त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी भेट देत आहेत.
याच पार्श्वभूमीवर राजहंस दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख यांनी बागुल कुटुंबीयांच्या निवासस्थानी जाऊन भावपूर्ण सांत्वनपर भेट दिली. यावेळी त्यांनी कै. पंढरीनाथ बागुल यांचे चिरंजीव संजय पंढरीनाथ बागुल यांची भेट घेऊन त्यांच्या दुःखात सहभागी होत धीर दिला. “आपल्या वडिलांनी समाजात जपलेली माणुसकी, प्रामाणिकपणा आणि सेवाभावाची परंपरा कायम स्मरणात राहील. या कठीण प्रसंगी आम्ही सर्वजण आपल्या कुटुंबासोबत आहोत,” अशा भावना रणजितसिंह देशमुख यांनी व्यक्त केल्या.
कै. पंढरीनाथ बागुल यांनी आपल्या शांत, संयमी आणि मनमिळावू स्वभावामुळे समाजात वेगळे स्थान निर्माण केले होते. सर्वसामान्यांशी जिव्हाळ्याचे संबंध ठेवत त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली. त्यांच्या निधनाने पिंपरणे परिसराने एक प्रेमळ, कर्तृत्ववान आणि सर्वांना आपलेसे वाटणारे व्यक्तिमत्त्व गमावल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
या सांत्वन भेटीप्रसंगी आरपीआयचे ज्येष्ठ नेते सुधाकरराव रोहम, दिनकरराव वाकचौरे, अरुणसाहेब देशमुख, राजहंस दूध संघाचे संचालक रवी रोहम, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र देशमुख, अजित मांडे, अजित देशमुख, रावसाहेब ठोंबरे, धनंजय देशमुख तसेच परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थितांनी कै. पंढरीनाथ विश्राम बागुल यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. तसेच बागुल कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याची शक्ती लाभो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना व्यक्त करण्यात आली. त्यांच्या स्मृती, कार्य आणि माणुसकीचा वारसा समाजाला सदैव प्रेरणा देत राहील, अशा भावना उपस्थित मान्यवरांनी यावेळी व्यक्त केल्या.
