मढीच्या यात्रेत  दोन दिवस अगोदरच गाढवांचा बाजार ; पंजाबी गाढवास लाखाचा भाव
मढीत भरतो गाढवांचा सर्वात मोठा बाजार
लोकवेध live न्यूज 
पाथर्डी तालुक्यापासून 12 किलोमीटर अंतरावर मढी येथे कानिफनाथ देवस्थान आहे. कैकाडी समाजाची मानाची काठी मंदिराच्या कळसाला लावल्यानंतर आणि गोपाळ समाजाची मानाची होळी पेटल्यानंतर मढीच्या यात्रेला सुरुवात होत असते. दरवर्षी येथे मोठी यात्रा भरत असते. होळीला सुरू झालेले ही यात्रा पाडव्यापर्यंत म्हणजेच तब्बल पंधरा दिवस चालते.
 यात्रेत गाढवाच्या बाजारामध्ये पंजाबी संकरित तीन गाढवांपैकी एक गाढव तब्बल एक लाख रुपयाला विकले गेले आहे. त्यामुळे यात्रेतील हे गाढव लाख मोलाचे ठरलं.
याशिवाय या यात्रेमधील गाढवाच्या बाजारात काठेवाडी गाढवांची टंचाई निर्माण झाल्याचे दिसून आले. काठेवाड गुजरात येथून बाजारासाठी पायी येत असलेल्या तीनशे पैकी एकशे तीस गाढवांची रस्त्यातच विक्री झाली. त्यामुळे मढीच्या बाजारात पोहोचेपर्यंत अवघी 170 गाढवेच शिल्लक राहिली होती.
यंदा प्रथमच पंजाबमधून विक्रीसाठी गाढवे आली असून, एक पंजाबी गाढव सुमारे एक लाख रुपयाला विकले गेले. राज्यात माळेगाव, नांदेड, जेजुरी, देऊळगाव राजा व मढी येथे गाढवांचा बाजार भरतो. आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरात, तेलंगणा राज्यातूनही मढीच्या बाजारासाठी व्यापारी येतात. चतुर्थी, रंगपंचमी व नाथ षष्ठी असा तीन दिवस पूर्वीपासून मढी येथील गाढवांचा बाजार प्रचलित आहे.
मढीची गाढवांची यात्रा देशभर प्रसिद्ध आहे. या यात्रेत भरणाऱ्या बाजारामध्ये आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरात, तेलंगणा राज्यातून मोठ्या प्रमाणात व्यापारी येत असतात.
पंधरा दिवसांच्या या यात्रेमध्ये शेकडो वर्षापासून गाढवांचा बाजार भरतो. गाढवांच्या बाजारातील हा सर्वात मोठा बाजार असल्याने शेजारच्या राज्यातून गाढवाचे व्यापारी आपली गाढवे विकायला घेऊन येतात. गावरान गाढव, काठेवाडी गाढव आदी प्रकारच्या गाढवांचा यात भरणा असतो. साधारणता तीन हजार रुपयांपासून पुढे गाढवे विकली जातात. भटक्यांची पंढरी म्हणून मढीच्या यात्रेला ओळखले जाते. राज्यभरातून लाखो लोक या यात्रेसाठी हजेरी लावत असतात. कानिफनाथ महाराजांनी आपल्या आयुष्यात भटक्या विमुक्तांसाठी काम केल्याने, यात्रेच्या कालावधीमध्ये भटक्या समाजातील लोक मढीत मोठी गर्दी करत असतात.
संगमनेर, श्रीरामपूर, बिडकीन, पाटोदा भागातील ग्राहकांनी यंदा बाजारात मालाची आवक कमी असल्याचे सांगितले. मढी येथील गाढवांच्या बाजाराचे आकर्षण गेल्या काही दिवसांपासून कमी होत आहे. दहा वर्षांपूर्वी गाढवांचा बाजारतळ गाढवांना उभे राहण्यासाठी सुद्धा पुरत नव्हता. आज परिस्थिती पूर्णपणे बदलून संपूर्ण बाजारतळ गाढवांविना ओस पडल्याचे जाणवले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!