राजमाता जिजाऊ बसची स्टेअरिंग आमदार खताळ यांच्या हातात

राजमाता जिजाऊ’ बसमधून अमोल खताळांची कार्यकर्त्यांसह सफर”

परिवहनमंत्र्यांकडून मंजूर पाच नव्या बसेसचे लोकार्पण

संगमनेर | प्रतिनिधी

सामान्यतः आमदार विकासकामांचे भूमिपूजन, उद्घाटने किंवा शासकीय बैठका घेताना दिसतात. मात्र संगमनेरचे शिवसेना महायुतीचे आमदार अमोल खताळ यांनी एक वेगळीच भूमिका पार पाडत थेट एसटी बसचे स्टेअरिंग हातात घेत काही अंतर स्वतः बस चालवली आणि त्याच’ बसमधून प्रवास करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. संगमनेर बसस्थानकातून सुरू झालेली ही विशेष सफर नाशिक रोड मार्गे निमोण नाका येथे पोहोचली आणि तेथून पुन्हा बसस्थानकात परतली. या अनपेक्षित उपक्रमामुळे प्रवासी, अधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले.
संगमनेर आगाराच्या ताफ्यामध्ये परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या माध्यमातून पाच नवीन ‘राजमाता जिजाऊ’ बसेस दाखल झाल्या आहेत या बसेस मिळविण्यामागे आमदार खताळ यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा महत्त्वाचा ठरला. काही दिवसांपूर्वी त्यांनी मुंबई येथे राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेत संगमनेर आगारासाठी मंजूर बसेस तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. आमदार खताळ यांच्या मागणीची त्वरित दखल घेत परिवहन मंत्री सरनाईक यांनी संगमनेर आगारासाठी पाच नवीन बसेस मंजूर केल्या. त्यानंतर या बसेस रात्री संगमनेर दाखल झाल्या या बसेसचे लोकार्पण आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते करण्यात आले.

लोकार्पण सोहळ्यानंतर महायुतीच्या कार्यकर्त्यांनी आमदार खताळ यांना बस चालविण्याचा आग्रह धरला. त्या नंतर त्यांनी स्वतः चालकाच्या आसना वर विराजमान होत स्वतः राजमाता जिजाऊ बसचे स्टेअरिंग हातात घेत बस चालू केली. बस सुरू होताच उपस्थितांमध्ये एकच कुतूहल निर्माण झाले. बसस्थानक परिसरात जमा झालेल्या नागरिकांनी हा अनोखा क्षण आपल्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये टिपण्यासाठी गर्दी केली होती निमोण नाका पर्यंतच्या प्रवासाच्या दरम्यान आमदार खताळ यांनी बसमधील आसनव्यवस्था, सीसीटीव्ही कॅमेरे प्रवाशांसाठी उपलब्ध सुविधा, सुरक्षिततेच्या उपाययोजना तसेच बसची एकूण कार्यक्षमता यांची बारकाईने पाहणी केली. या विशेष प्रवासात संगमनेर आगाराचे आगार व्यवस्थापक प्रशांत गुंड, यांच्यासह शिवसेना-महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते. नव्या बसेसचे आगमन आणि आमदारांनी स्वतः बस चालविल्याचा अनुभव हा या दिवसाचा चर्चेचा विषय ठरला. संगमनेरकरांनीही या उपक्रमाचे स्वागत करत नव्या बसेसमुळे प्रवास अधिक सोयीस्कर होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली.

कोट-
ग्रामीण भागातील जनतेसाठी एसटी ही केवळ वाहतुकीची सेवा नसून जीवनवाहिनी आहे. विद्यार्थी, शेतकरी, कामगार, महिला आणि ज्येष्ठ नागरिक यांचा दैनंदिन प्रवास एसटीवर अवलंबून असतो. त्यामुळे प्रवाशांना सुरक्षित,आरामदायी आणि दर्जेदार सेवा मिळणे आवश्यक आहे. संगमनेर आगाराच्या ताफ्यात नव्या बसेस दाखल झाल्याने सेवेची गुणवत्ता आणखी उंचावण्यास मदत होणार आहे.

– अमोल खताळ ( आमदार)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!