▪️रामकथा प्राणिमात्रांसह मानवी जीवनाची व्यथा दूर करणारी : रामकथाकार ढोक महाराज
▪️निरपेक्ष सेवेच्या तेजाकडे संत महंतांचाही ओढा असतो
{ राम वनवास, केवट भेट, भरत मिलाप, चित्रकूट, शूर्पणखा अशोकवनाचे निरूपण }
सप्ताह स्थळी गर्दीचा उच्चांक
संगमनेर
प्रभू श्रीराम हे एक वचनी, एक बाणी आणि एक पत्नी या आदर्श तत्त्वांचे मूर्तिमंत प्रतीक असून त्यांचे जीवन संपूर्ण मानवजातीसाठी प्रेरणादायी आहे. आज्ञा होताच कर्तव्यपालन करणारे, वचनासाठी सर्वस्वाचा त्याग करणारे, मर्यादा पुरुषोत्तम म्हणून जगाला आदर्श देणारे श्रीरामांचे चरित्र प्राणीमात्रांसह मानवी जीवनातील दुःख, व्यथा आणि संभ्रम दूर करणारे आहे असे प्रतिपादन रामकथाकार विदर्भरत्न ह.भ.प. रामराव महाराज ढोक यांनी केले.
प.पू.गगनगिरी महाराज सप्ताहानिमित्त सुरू असलेल्या अधिक मासातील आठव्या पर्वाच्या सहाव्या भागातील रामकथा निरूपणात ढोक महाराज बोलत होते. आपल्या ओघवत्या, रसाळ आणि भावपूर्ण शैलीत त्यांनी रामायणातील अनेक प्रसंगांचे चित्र जिवंत उभे केले की, उपस्थित भाविकांना जणू चित्रकूट, मंदाकिनीचा तट, अनसूया मातेचा प्रसंग, ऋषीमुख पर्वत, केवट भेट, भरत मिलाप आणि राम वनवास हे प्रसंग प्रत्यक्ष डोळ्यांसमोर घडत असल्याची अनुभूती आली.
काम, क्रोध, मोह आणि अहंकार यांचे मानवी जीवनावर होणारे परिणाम स्पष्ट करताना त्यांनी रामायणातील प्रसंगांच्या माध्यमातून जीवनमूल्ये उलगडून सांगितली. केवट प्रसंगाचे वर्णन करताना भगवंताच्या चरणस्पर्शाने नाव पवित्र झाली, तर संत मीराबाईच्या चरणांमुळे घुंगरू पवित्र झाले असे सांगत भक्ती आणि साधनेचे महत्त्व अधोरेखित केले. सुमंत, कौसल्या, सुमित्रा आणि अयोध्यावासीयांचा विरह, राम वनवासाच्या वेळी पशुपक्ष्यांनाही आलेले दुःख आणि भरताने सिंहासनावर पादुका ठेवून केलेला त्याग यांचे वर्णन करताना अनेक भाविकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. तर कौशले ने भरताला राज सिंहासन मिळण्यासाठी केलेले अनुमोदन ही एक वैश्विक विचारधाराच समस्त विश्वासमोर ढोक महाराजांनी एका अनोख्या शब्दात उभी केली.
व्याख्यान किर्तन प्रवचन कथा निरूपण करताना प्रसंग तुटल्यावर काय अवस्था होते, हे फक्त वक्ता झाल्यावरच कळते असे सांगत त्यांनी श्रोत्यांच्या तल्लीनतेचा उल्लेख केला. शूर्पणखेचा पती विद्युतजिव्हा, तर मुलगा शंभरी, जटायू, रावणाने सीतेचे केलेले अपहरण, युद्धप्रसंग साक्षात उभे करत अशोकवनातील सीतेची अवस्था तसेच माया, ज्ञान आणि वैराग्य यांचे तत्त्वज्ञान त्यांनी सोप्या भाषेत उलगडून सांगितले. समस्त वारकऱ्यांचे न्यायपीठ पंढरपूर असून विठ्ठल हा त्या न्यायपीठाचा न्यायाधीश आहे असे सांगत त्यांनी भक्तीमार्गाचे महत्त्व विशद केले. ज्या ठिकाणी स्वार्थ नसतो आणि निरपेक्ष भावनेने कार्य केले जाते, त्या ठिकाणी संत महंतही आकर्षित होतात, असेही ढोक महाराज आणि गुंजाळवाडीत होणाऱ्या राम कथेची निरपेक्षता भव्यता शिस्तता खास शैलीत नमूद केली.
*पत्रकारांना विरोध करू नये*
रामकथेचे निरूपण करताना रामायणाचार्य ढोक महाराज यांनी पत्रकारांच्या भूमिकेचे विशेष कौतुक केले. राम कथेचा संदेश समाजाच्या कानाकोपऱ्यात पोहोचविण्यासाठी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या प्रसिद्धीबद्दल त्यांनी पत्रकारांची प्रशंसा केली. यावेळी उपस्थित भाविकांना मार्गदर्शन करताना त्यांनी पत्रकार, डॉक्टर, आचारी आदि सारख्या समाजहितेषी कार्य करणाऱ्या व्यक्तींना विनाकारण विरोध करू नये, असा मोलाचा सल्ला दिला.
समाजप्रबोधन आणि जनजागृतीमध्ये पत्रकारांचे योगदान महत्त्वाचे आहे. त्यामुळे पत्रकारांबद्दल आदराची भावना ठेवली पाहिजे. त्याचप्रमाणे डॉक्टर, आचारी आणि इतर सेवाभावी घटकांनाही सहकार्य करणे हे समाजाच्या हिताचे आहे असल्याचे ते म्हणाले.
*कथेत तल्लीन झालेल्या रामायनाचार्याची नजर बाळासाहेब थोरातांवर; टाळ्याच्या गजरात केले स्वागत*
रामकथेचे निरूपण करत असताना कथेशी पूर्णपणे एकरूप झालेल्या रामायणाचार्य ढोक महाराज यांची नजर उपस्थित भाविकांवर सतत फिरत होती. याच दरम्यान त्यांचा कटाक्ष माजी महसूल मंत्री बसलेल्या ठिकाणी गेला. कथा श्रवणासाठी बाळासाहेब थोरात उपस्थित असल्याचे त्यांनी आपल्या ओघवत्या निरूपणातून भाविकांच्या निदर्शनास आणून दिले.
बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीचा उल्लेख होताच संपूर्ण कथामंडप टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदुमून गेला. ढोक महाराज यांनीही त्यांचे स्वागत करत उपस्थितीबद्दल आनंद व्यक्त केला. बाळासाहेब थोरात यांच्या सारखे लोकप्रतिनिधी रामकथेच्या श्रवणासाठी उपस्थित राहतात, ही आनंदाची आणि समाधानाची बाब आहे असे सांगत त्यांच्या आगमनाने कथेचा आनंद द्विगुणित झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. यावेळी आरतीचा मान माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आमदार सत्यजित तांबे शहराच्या नगराध्यक्ष डॉक्टर मैथिली तांबे सह उपस्थित मान्यगणांना देण्यात आला.
*ढोक महाराजांच्या निरूपणातून श्रीरामांचे दर्शन घडते :- सत्यजीत तांबे*
— महाराष्ट्राच्या समस्त कथाकारामध्ये रामायणाचार्य ढोक महाराजांचा हात कोणीही पकडू शकत नसल्याचे रामकथेच्या पावन सोहळ्यात आमदार सत्यजित तांबे यांनी रामायणाचार्य ढोक महाराज यांच्या विद्वत्तेचा गौरव केला. ढोक महाराजांच्या वाणीतून रामायणाचा इतिहास जिवंत होतो. त्यांच्या कथा निरूपणातून प्रत्यक्ष प्रभू श्रीरामांचे दर्शन घडते. साधी, सरळ, रसाळ आणि सर्वसामान्यांना समजणारी त्यांची शैली हेच त्यांचे वैशिष्ट्य असल्याचे आमदार सत्यजित तांबे यांनी गौरवोद्गार काढले*अफाट विद्वत्ता, इच्छाशक्ती, ओजस्वी वाणी ही दैवी देणगी :- बाळासाहेब थोरात*
—- ढोक महाराजांचे दर्शन, त्यांचा सहवास आणि त्यांच्या मुखातून रामकथा श्रवण करणे म्हणजे अमृतपान करण्यासारखे आहे. त्यांची अफाट स्मरणशक्ती, विद्वत्ता, इच्छाशक्ती आणि ओजस्वी वाणी ही दैवी देणगी असल्याचे प्रतिपादन माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. थोरात म्हणाले की, तुळसीदासांचे तुळसी रामायण’ जसे अत्यंत मधुर गोड आणि भावस्पर्शी आहे, त्याच परंपरेतील भक्तिरस ढोक महाराज आपल्या निरूपणातून जनमानसापर्यंत पोहोचवत आहेत.
यावेळी थोरात यांनी ढोक महाराजांच्या उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा देत, आपली आध्यात्मिक सेवा अशीच अविरत सुरू राहो, अशी भावना व्यक्त करत तब्येतीची काळजी घ्या अशा भावना व्यक्त केल्या. तसेच भरघोस पावसासाठी प्रार्थना करत, शेतकरी सुखी झाला तर समाज आणि जग सुखी होईल. शेतकरी हा देशाच्या जीवनचक्राचा आधारस्तंभ आहे असेही थोरात यांनी आवर्जून सांगितले.
