कष्टातून यशाचा गड सर करणाऱ्या मित्र राजेंद्र वाकचौरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
माणसाच्या आयुष्यात काही व्यक्ती अशी असतात की त्यांचं आयुष्य हेच एक प्रेरणास्रोत असतं. अशीच एक नम्र, कष्टाळू, सोज्वळ आणि सगळ्यांशी मनापासून जुळणारी व्यक्ती म्हणजेच आपले लाडके मित्र राजेंद्र दिनकर वाकचौरे. आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या आयुष्याचा हा छोटासा गौरव करून त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा देणे हेच आमचे कर्तव्य आहे.
राजेंद्रभाऊंनी आयुष्यात अनेक अडचणींना तोंड दिलं, पण कधीही हार मानली नाही. अगदी लहानपणापासूनच परिस्थितीशी झुंज देताना त्यांनी कष्टांची सवय अंगी बाणवली. शिक्षण, शेती, कुटुंब आणि समाज या सर्व पातळ्यांवर त्यांनी आपल्या जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडल्या. आई-वडिलांची सेवा ही आपली खरी संपत्ती मानणाऱ्या राजेंद्रभाऊंनी आपल्या माता-पित्याची अत्यंत निष्ठेने सेवा केली.
गावात कोणताही माणूस दुःखी असेल, गरजूंना मदतीची आवश्यकता असेल तर राजेंद्रभाऊ नेहमी पुढे सरसावलेले दिसतात. कुठेही कोणाशीही भांडण-तंटा न करता सर्वांशी मिळून मिसळून राहणं ही त्यांची खासियत आहे. त्यामुळेच ते खऱ्या अर्थाने ‘आजातशत्रू’ या शब्दाला साजेशी व्यक्ती आहेत. गावात वृद्धांपासून तरुणांपर्यंत सर्वांच्या मनात त्यांच्या विषयी अपार प्रेम आणि आदर आहे.
त्यांची आणखी एक खास ओळख म्हणजे मित्रांच्या प्रत्येक संकटात उपस्थित राहणारा आणि मदतीला धावून जाणारा मित्र. कोणत्याही मित्राला अडचण आल्यास राजेंद्रभाऊ सर्व कामं बाजूला ठेवून तत्काळ मदतीसाठी उभे राहतात. त्यांच्या या स्वभावामुळेच त्यांचं मित्रमंडळ आजही दृढ नात्याने जोडलेलं आहे.
स्वतःच्या प्रपंचाला त्यांनी चांगली दिशा दिली. केवळ स्वतःचा विचार न करता, मुलांना उच्चशिक्षणाची संधी देत त्यांनी एक जबाबदार आणि द्रष्टे पालकत्वही निभावले आहे. आज त्यांची मुले उच्चशिक्षित झाली आहेत, ही गोष्ट त्यांच्या दूरदृष्टीची आणि संस्कारांची साक्ष देणारी आहे.
राजेंद्रभाऊ हे केवळ एक व्यक्तिमत्त्व नाही, तर एक अनुभव आहे – जीवन कसे जगावे, त्यात संघर्ष असूनही संयम, सन्मान आणि संस्कार कसे जपावेत याचा आदर्श वस्तुपाठ.
त्यांच्या वाढदिवसाच्या या खास दिवशी त्यांना दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य, कुटुंबात सुख-समाधान आणि समाजात अजून अधिक प्रेम लाभो, हीच मन:पूर्वक प्रार्थना.
राजेंद्रभाऊ, तुमच्या जिद्दीच्या आणि सेवाभावी स्वभावाच्या या प्रेरणादायी प्रवासाला आमचा सलाम!
तुमच्या पुढील वाटचालीस अनंत शुभेच्छा!
– शुभेच्छुक : पत्रकार सुभाष भालेराव
