गुरूरायांना वंदन करीत टाकळी शाळेत शिक्षक दिनाचा जल्लोष

– विद्यार्थ्यांच्या ओवाळणीने उजळले गुरूवंदन

अकोले / लोकवेध live न्यूज

गुरूविण न मिळे ज्ञान
ज्ञानाविण जगी न होई सन्मान
जीवन भवसागर तराया
चला वंदूया गुरूराया

या प्रेरणादायी ओळींनी गुंजलेल्या वातावरणात जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा, टाकळी येथे भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय शिक्षक दिन मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला.

या विशेष दिनी इयत्ता ५ वी ते ७ वी मधील विद्यार्थी-शिक्षकांनी वर्गात अध्यापन करून शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. शाळा संचालनाची जबाबदारी निभावत त्यांनी शिक्षकांच्या भूमिकेचे दर्शन घडवले. अनुभव कथन कार्यक्रमात बालशिक्षकांनी आपल्या गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करत त्यांच्या अथक परिश्रमांना व नि:स्वार्थ त्यागाला वंदन केले.

शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी व शाळा व्यवस्थापन समितीने सर्व शिक्षकांचा पेन व गुलाबपुष्प देऊन यथोचित सन्मान केला. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन व संयोजन चिमुकल्या बालशिक्षकांकडूनच करण्यात आले होते, ही विशेष बाब ठरली.

या प्रेरणादायी कार्यक्रमासाठी टाकळी केंद्रशाळेचे मुख्याध्यापक डॉ. श्रीनिवास पोतदार यांच्यासह सहशिक्षक दत्तात्रय देवगिरे, संजय देशमुख, संजय शिंदे व निता लेंभे यांचे मार्गदर्शन लाभले.

🌸 गुरूंनी दिलेला ज्ञानदीप विद्यार्थ्यांच्या जीवनात सदैव प्रकाशमान राहो हीच प्रार्थना. 🌸

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!