निमगाव जाळी सेवा सोसायटीच्या उपाध्यक्षपदी सौ. लिलाबाई थेटे यांची बिनविरोध निवड
निमगाव जाळी / लोकवेध Live न्यूज / प्रतिनिधी अशोक गोसावी
निमगाव जाळी (ता. संगमनेर) येथे आज दिनांक १० सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता वि.का. सहकारी सेवा सोसायटीच्या सभागृहात उपाध्यक्ष (व्हाईस चेअरमन) पदाची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत सौ. लिलाबाई इंद्रभान थेटे यांची बिनविरोध निवड उपाध्यक्षपदी करण्यात आली.
या निवडीमुळे महिला नेतृत्वाला मिळालेला नवा वाव व गावातील महिलांच्या राजकीय सहभागाला मिळालेली दिशा ग्रामस्थांमध्ये कौतुकास्पद ठरली.
या निवडीप्रसंगी मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रमाला उत्सवी वातावरण लाभले. सरदार त्रिंबकजी डेंगळे प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाबासाहेब डेंगळे, प्रगतशील शेतकरी अविनाश थेटे, पो.पा. दिलीप डेंगळे, सोसायटीचे चेअरमन माधव डेंगळे, उपसरपंच सुरेश डेंगळे, माजी सरपंच सुजाताताई थेटे, दुधेश्वर उपसा जलसिंचनचे अध्यक्ष रमेश डेंगळे, दत्तात्रय डेंगळे, बाबासाहेब तळोले, इंद्रभान थेटे, अण्णासाहेब थोरात, गणेश वदक, बाबासाहेब डेंगळे यांच्यासह गावातील अनेक प्रतिष्ठित मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी सौ. लिलाबाई थेटे यांच्या निवडीबद्दल मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. त्यांनी सोसायटीच्या प्रगतीसाठी व शेतकरी, ग्रामस्थ यांच्या हितासाठी नेहमीच काम करावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
सौ. लिलाबाई थेटे यांनी यावेळी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, “सोसायटीच्या माध्यमातून गावकऱ्यांच्या आणि शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहीन. महिला सक्षमीकरणासाठी विशेष उपक्रम राबविण्याचा मानस आहे.”
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन दत्तात्रय डेंगळे यांनी केले तर आभार प्रदर्शन माधव डेंगळे यांनी मान्यवरांचे मानले.
या निवडीमुळे निमगाव जाळी सेवा सोसायटीला महिला नेतृत्वाचे बळ लाभले असून भविष्यात या नेतृत्वातून सोसायटीच्या कार्याला नवी दिशा मिळेल, असा विश्वास ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.
