शिक्षकांच्या हक्कासाठीचा आवाज बुलंद – अहिल्यानगर पदवीधर शिक्षक महासंघाची नवी कार्यकारिणी जाहीर”

अहिल्यानगर / लोकवेध live न्यूज 

शिक्षक हा समाजाच्या भवितव्याचा शिल्पकार आहे; पण त्याच्या हक्कांच्या प्रश्नांकडे प्रशासन वारंवार दुर्लक्ष करते. त्या अन्यायाविरोधात ठामपणे उभे राहणे हीच खरी संघटनेची ताकद आहे” – या भावनेने भारलेली महाराष्ट्र राज्य पदवीधर शिक्षक महासंघाची अहिल्यानगर जिल्हा कार्यकारिणी नुकतीच जाहीर झाली.

या निवडीत जिल्हाध्यक्षपदी प्रीतम गुरव (कर्जत), जिल्हा कार्याध्यक्षपदी डॉ. श्रीनिवास पोतदार (अकोले), जिल्हा सरचिटणीसपदी संतोष शिंदे (श्रीगोंदा), तर जिल्हा कोषाध्यक्षपदी बाळासाहेब दातीर (शेवगाव) यांची निवड झाली. याशिवाय राज्य उपाध्यक्षपदी तुषार दळवी आणि राज्य प्रतिनिधीपदी अतुल धालपे यांची निवड होऊन जिल्ह्याचा मान उंचावला आहे.

राज्य सरचिटणीस महेश डोईफोडे यांनी सांगितले की, लवकरच कार्यकारिणीचा विस्तार करून जिल्ह्यातील सर्व १४ तालुक्यांतील प्रतिनिधींना स्थान दिले जाईल. विशेष म्हणजे महिला प्रतिनिधींनाही कार्यकारिणीत योग्य प्रतिनिधित्व दिले जाणार आहे.

नवनियुक्त जिल्हाध्यक्ष प्रीतम गुरव यांनी स्पष्ट शब्दांत मत व्यक्त केले की,
“सुधारित वेतनश्रेणी, पदोन्नती, सेवापुस्तक पडताळणी, बिंदू नामावली, पेसांतर्गत शिक्षकांच्या समस्या, अतिरिक्त झालेल्या शिक्षकांचे प्रश्न, प्रशिक्षित-अप्रशिक्षित शिक्षकांतील तफावत, तसेच उच्चविद्याविभूषित शिक्षकांना न्याय मिळवून देणे – हे आमचे ध्येय आहे. या सर्व प्रलंबित प्रश्नांवर नवी कार्यकारिणी जोमाने लढेल.”

नवीन नेतृत्वाचा उत्साह संपूर्ण जिल्ह्यातील शिक्षकांना नवचैतन्य देणारा आहे. त्यांच्या हक्कांसाठी, न्यायासाठी आणि सन्मानासाठी ही कार्यकारिणी लढाई उभारणार आहे, असा विश्वास शिक्षकांमध्ये व्यक्त केला जात आहे.

या निवडीबद्दल राज्याध्यक्ष गिरीश वाणी (जळगाव), राज्य कोषाध्यक्ष शरद सूर्यवंशी (धुळे), राज्य उपाध्यक्ष किशोर पाटील, राज्य सल्लागार निशिगंधा साळवे, तसेच महिला विभागाच्या राज्याध्यक्षा मीनाताई पगारे (मुंबई) यांनी पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून उज्ज्वल कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!