राज्यस्तरीय व्हॉलीबॉलसाठी शिक्षकाची निवड; देवळा गावचा अभिमान ठरले हनुमंत आपेट
अंबाजोगाई / सुरेश मंत्री
तालुक्यातील देवळा येथील विश्वरूपी माध्यमिक विद्यालयातील क्रीडाप्रेमी शिक्षक हनुमंत आपेट यांची शिक्षक, अधिकारी व कर्मचारी राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल शाळा व्यवस्थापन, शिक्षकवृंद व ग्रामस्थांच्या वतीने गौरवपूर्ण सत्कार करण्यात आला. यानिमित्ताने त्यांना आगामी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
मंगळवार, दि. १६ डिसेंबर रोजी आयोजित या सत्कार व शुभेच्छा समारंभाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक खोसे एस. जे. होते. प्रमुख पाहुणे म्हणून भरत महाराज खामकर, गोपाळ पवार, अनंत पवार, त्रिंबक पाटील तसेच प्राचार्य मेघराज देशमुख यांची उपस्थिती होती. यावेळी हनुमंत आपेट यांचा शाल, पुष्पगुच्छ व फेटा देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमात प्रिती पवार, बुशरा शेख व भाग्यश्री सगट या विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त करून शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. भरत महाराज खामकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना क्रीडा व शिक्षण यांचा समतोल जीवनात कसा महत्त्वाचा आहे, यावर प्रकाश टाकला. स्वागतगीत उत्कर्षा शितोळे व साक्षी खामकर यांनी सादर केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रविंद्र काळम यांनी केले तर आभारप्रदर्शन सुरेश मंत्री यांनी मानले. यावेळी प्राध्यापक राहुल सोनवणे यांच्यासह गावातील बहुसंख्य नागरिक, शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हनुमंत आपेट यांच्या या यशामुळे देवळा गावाच्या शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील लौकिकात भर पडल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
