महिलेचे आरोग्य म्हणजे कुटुंबाच्या सुखाचे आधारस्तंभ ;
गॉड्स असेंबल मिनिस्ट्री यांच्या वतीने जागतिक महिला दिन साजरा
संगमनेर :
 जागतिक महिला दिनानिमित्त ८ मार्च २०२६ रोजी गॉड्स असेंबल मिनिस्ट्री यांच्या वतीने महिला आरोग्य विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महिलांच्या आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि कुटुंबाच्या सुदृढतेत महिलेची भूमिका अधोरेखित करण्यासाठी हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
“महिलेचे उत्तम आरोग्य म्हणजे कुटुंब सुदृढ व सुखी” या विषयावर यावेळी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करण्यात आले. दैनंदिन जीवनात आरोग्याची काळजी कशी घ्यावी, संतुलित आहाराचे महत्त्व, तसेच कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य जपण्यासाठी महिलांनी कोणती काळजी घ्यावी याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्षा मा. सौ. उज्वला जगताप होत्या. त्यांनी महिलांना नियमित आरोग्य तपासणीचे महत्त्व सांगत मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य टिकवण्यासाठी योग्य जीवनशैली अंगीकारण्याचे आवाहन केले. महिला कुटुंबाचा आधारस्तंभ असून त्यांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमास परिसरातील अनेक महिलांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली. कार्यक्रमातून महिलांना आरोग्याबाबत उपयुक्त मार्गदर्शन मिळाल्याने उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!