जयहिंद लोकचळवळीच्या राज्यस्तरीय युवा शेतकरी सन्मान सोहळ्यात राज्यभरातील कर्तृत्ववान शेतकऱ्यांचा गौरवशेतीला सक्षम केल्याशिवाय विकसित भारताचे स्वप्न साकार होणार नाही – लोकनेते बाळासाहेब थोरातशेतमालाला जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी शासनाची व्यापक तयारी – मंत्री जयकुमार रावल
नाशिक / संगमनेर ( प्रतिनिधी ) जयहिंद लोकचळवळीच्या कृषी विभागातर्फे आयोजित राज्यस्तरीय युवा शेतकरी सन्मान सोहळा २०२६’ उत्साहात पार पडला. नाशिक येथे झालेल्या या सोहळ्यात राज्यभरातील आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीत नावीन्यपूर्ण प्रयोग करणाऱ्या युवा शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. हरितक्रांतीचे प्रणेते, माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या या उपक्रमाचे यंदा दहावे वर्ष होते.
लोकनेते बाळासाहेब थोरात आणि जयहिंद लोकचळवळीचे संस्थापक माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आमदार सत्यजीत तांबे यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात येतो. कार्यक्रमाला राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे, सह्याद्री फार्म्सचे संस्थापक विलास अण्णा शिंदे, आमदार मनोज कायंदे, जय हिंद महिला मंचच्या अध्यक्षा दुर्गाताई तांबे, प्रवीण जाधव, नामदेवराव गुंजाळ, प्रा. सुनील बच्छाव यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
प्रास्ताविकात डॉ.सुधीर तांबे यांनी जयहिंद लोकचळवळीच्या २८ वर्षांच्या कार्याचा आढावा घेत, शेती, शिक्षण, आरोग्य, युवक आणि महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून सुदृढ समाज उभारण्याचा चळवळीचा संकल्प असल्याचे सांगितले. कृषी क्षेत्रात उत्पादकता वाढ, समूहशेती, इंटिग्रेटेड फार्मिंग, चांगल्या कृषी पद्धती आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून शेती अधिक फायदेशीर करण्याची गरज त्यांनी मांडली. पुरस्कार विजेते शेतकरी हे इतरांसाठी प्रेरणास्थान बनून आपले अनुभव गावागावात पोहोचवावेत, असे आवाहनही त्यांनी केले.

“शेती बळकट झाली तरच विकसित भारताचे स्वप्न साकार होईल ” : लोकनेते बाळासाहेब थोरात
अध्यक्षीय भाषणात लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी हरितक्रांतीचे शिल्पकार वसंतराव नाईक, यशवंतराव चव्हाण आणि अण्णासाहेब शिंदे यांच्या योगदानाचे स्मरण करत, देशाच्या प्रगतीचा पाया हा शेतीत असल्याचे अधोरेखित केले. हवामान बदल, वाढता उत्पादन खर्च, बाजारभावातील अस्थिरता आणि विक्री व्यवस्थेतील अडचणी ही शेतीसमोरील प्रमुख आव्हाने असल्याचे त्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांनी केलेले यशस्वी प्रयोग कृषी विद्यापीठांनी अभ्यासून राज्यभर पोहोचविणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. सह्याद्री फार्म्ससारखी शेतकरी उत्पादक कंपन्यांची यशस्वी मॉडेल्स ग्रामीण भागात उभी राहिली तर शेतीला नवी दिशा मिळेल, असे ते म्हणाले. समूहशेती, प्रक्रिया उद्योग, मूल्यवर्धन आणि सक्षम पणन व्यवस्था यांशिवाय शेतीचा विकास शक्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांचा सन्मान हा केवळ पुरस्कारापुरता न राहता त्यांच्या कार्यातून इतर शेतकऱ्यांना प्रेरणा मिळाली पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
“उत्पादनाबरोबरच प्रक्रिया, निर्यात आणि बाजारपेठेवरही भर द्यावा” : मंत्री जयकुमार रावल
प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी कृषी क्षेत्राला बळकटी देण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती दिली. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, पीक विमा, सिंचन प्रकल्प, कृषी पायाभूत सुविधा, कोल्ड चेन, डिजिटल कृषी व्यवस्था आणि महिला शेतकरी सक्षमीकरणासाठी शासन सातत्याने काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांनी केवळ उत्पादनावर न थांबता प्रक्रिया उद्योग, ब्रँडिंग, साठवणूक आणि निर्यातक्षम शेतीकडे वळण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. नाशिक परिसरात जागतिक दर्जाची कृषी बाजारपेठ उभारण्याचे नियोजन सुरू असून, त्यातून शेतमालाच्या विक्रीसाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध होतील, असे त्यांनी सांगितले. तसेच जागतिक बँकेच्या सहकार्याने राबविण्यात येणाऱ्या ‘MAGNET’ (Maharashtra Agribusiness Network Project) प्रकल्पाच्या माध्यमातून कृषी प्रक्रिया उद्योग आणि मूल्यवर्धनाला चालना दिली जात असून, शेतकरी आणि कृषी उद्योजकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
खासदार भास्कर भगरे यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करून शेतीत वेगळे प्रयोग करणाऱ्या युवा शेतकऱ्यांचे अभिनंदन केले. सह्याद्री फार्म्सचे मॉडेल राज्यातील शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगत, उत्पादनाबरोबर प्रक्रिया उद्योग, ब्रँडिंग आणि बाजारपेठेचे नियोजनही तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले. पुरस्कार विजेत्यांनी आपल्या अनुभवाचा लाभ इतर शेतकऱ्यांनाही करून द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
त्याचबरोबर, आमदार मनोज कायंदे यांनी पुढे मनोगत व्यक्त करताना जयहिंद लोकचळवळीच्या माध्यमातून कृषी, शिक्षण, सामाजिक आणि युवक क्षेत्रात सुरू असलेल्या उपक्रमांचा उल्लेख केला. राज्यभरातील यशस्वी शेतकऱ्यांना एकत्र आणून त्यांच्या प्रयोगांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि त्या माध्यमातून इतर शेतकऱ्यांना प्रेरणा देणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. भविष्यात ही चळवळ अधिक व्यापक स्वरूपात राज्यभर पोहोचेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

