*सर्वोत्कृष्ट अध्यक्ष पुरस्कारासह चार मानाच्या पुरस्कारांनी इनरव्हिल क्लब ऑफ अंबाजोगाईच्या अध्यक्षा संगीता नावंदर यांचा गौरव*
अंबाजोगाई (प्रतिनिधी) :
सामाजिक बांधिलकी, सेवाभाव आणि प्रभावी नेतृत्वाच्या जोरावर उल्लेखनीय कार्य करणाऱ्या इनरव्हिल क्लब ऑफ अंबाजोगाईच्या अध्यक्षा संगीता नावंदर यांना इंटरनॅशनल इनरव्हिल संस्थेच्या वतीने ‘सर्वोत्कृष्ट अध्यक्षा’ पुरस्कारासह विविध क्षेत्रांतील उत्कृष्ट कार्याबद्दल आणखी चार मानाचे पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. पुणे येथे आयोजित संस्थेच्या २०२५-२६ या वर्षाच्या वार्षिक पुरस्कार वितरण सोहळ्यात विभागीय चेअरमन डॉ. आशा देशपांडे यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला.


इनरव्हिल क्लब ऑफ अंबाजोगाईने वर्षभरात समाजोपयोगी उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करत सामाजिक सेवेचा आदर्श निर्माण केला. समाजातील गरजू, वंचित आणि दुर्बल घटकांपर्यंत मदतीचा हात पोहोचविण्यासाठी क्लबने सातत्याने विविध उपक्रम राबविले. विशेषतः दिव्यांग मुलांच्या गरजा ओळखून त्यांना आवश्यक साहित्य उपलब्ध करून देणे, त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविणारे उपक्रम आयोजित करणे, पर्यावरण संवर्धनासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करणे, महिलांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी मार्गदर्शन व त्यांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी सहाय्य करणे, तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रौढ शिक्षण, नेत्रतपासणी शिबिरे, मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि चष्म्यांचे वाटप अशा अनेक लोकोपयोगी उपक्रमांची यशस्वी अंमलबजावणी करण्यात आली.
लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत प्रत्येक घटकाला स्पर्श करणाऱ्या या सेवाकार्याची दखल इंटरनॅशनल इनरव्हिल संस्थेने घेत संगीता नावंदर यांच्या नेतृत्वाचा गौरव केला. त्यांच्या कार्यामुळे केवळ इनरव्हिल क्लब ऑफ अंबाजोगाईचीच नव्हे, तर अंबाजोगाई शहराचीही प्रतिष्ठा उंचावली आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल अध्यक्षा संगीता नावंदर यांच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, सामाजिक कार्यात योगदान देणाऱ्या अनेकांसाठी त्यांचे कार्य प्रेरणादायी ठरत आहे.
