भंडारदरा धरण शताब्दी वर्षानिमित्त ‘प्रवरामाईचा सन्मान’ आणि संगमनेर जिल्ह्याच्या आत्माराम देशमुख यांची उद्घाटनाची मागणी

अकोले :

सन २०२६ हे भंडारदरा धरणाच्या शताब्दीचे वर्ष असल्याने या ऐतिहासिक पर्वाचे औचित्य साधून प्रवरामाईचा मान-सन्मान, अकोले तालुक्याचा गौरव तसेच प्रस्तावित संगमनेर जिल्ह्याचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते आत्माराम गजानन देशमुख यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

नैसर्गिक साधनसंपत्तीने समृद्ध असलेल्या अकोले तालुक्यातून प्रवरा नदीचा उगम होतो. प्रवरामाईने आपल्या जलप्रवाहातून अहिल्यानगर जिल्ह्याची तहान भागविण्यासोबतच शेती, उद्योग आणि सहकाराला बळ दिले. तिच्या पाण्यामुळे परिसरात समृद्ध साखर पट्टा निर्माण झाला. आशिया खंडातील पहिला प्रवरा सहकारी साखर कारखाना उभारण्यातही या जलसंपदेचा मोठा वाटा राहिला. तसेच श्रीरामपूर तालुक्याच्या निर्मितीच्या विकासप्रक्रियेलाही प्रवरा खोऱ्याने महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

प्रवरातीरी संत ज्ञानेश्वर माऊलींच्या वास्तव्यामुळे या भूमीला आध्यात्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व प्राप्त झाले आहे. ‘उठी उठी अर्जुना घेई घेई धनुष्यबाण कौरव मातले’  संदेश देणाऱ्या या पवित्र भूमीने ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून महाराष्ट्राला तसेच जगाला अध्यात्म, ज्ञान आणि जीवनमूल्यांचा अनमोल ठेवा दिला. संघर्षातून विकासाचा मार्ग दाखविणाऱ्या अकोले तालुक्याचा आणि प्रवरामाईचा यथोचित गौरव होणे आवश्यक असल्याचे देशमुख यांनी निवेदनात नमूद केले आहे.

दुर्गम, डोंगराळ आणि आदिवासीबहुल अकोले तालुक्यातील जनतेला अधिक चांगल्या सोयी-सुविधा, विकासाच्या संधी आणि प्रशासकीय सुविधा मिळाव्यात, यासाठी संगमनेर जिल्ह्याची निर्मिती महत्त्वाची ठरू शकते. त्यामुळे भंडारदरा धरणाच्या शताब्दी महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते संगमनेर जिल्ह्याचे उद्घाटन करण्याची ऐतिहासिक घोषणा करावी, अशी आग्रही मागणी आत्माराम गजानन देशमुख यांनी केली आहे.

या मागणीमुळे भंडारदरा धरणाचा शतकभराचा इतिहास, प्रवरामाईचे योगदान आणि अकोले तालुक्याच्या विकासाचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!